मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला.
मुसळधार पावसात उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा चिमुरडा दिव्यांश याचा चार दिवस सातत्याने शोध घेतल्यानंतरही पालिका आणि अर्ग्निामक दलाच्या पथकांना दिव्यांश सापडला नसल्याने दिव्यांशचे वडील सूरज सिंग याच्या तक्रारीनुसार संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर दिंडोशी पोलिस ठाण्यात कामात हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.
गोरेगाव पूर्वेकडील भरतभाई पटेल कम्पाउंड भागात राहणारा दीड वर्षाचा दिव्यांश सिंग बुधवारी (ता. 10) मोतीलाल नेहरू रस्त्यालगतच्या नाल्यात पडला. महापालिका, अग्निशामक दल आणि अन्य यंत्रणांनी प्रयत्न करूनही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी त्याचे वडील सूरज सिंग यांनी सोमवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. उघड्या नाल्याबाबत माहिती देऊनही संबंधित सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हलगर्जी दाखवली. उघड्या नाल्यावर झाकण बसवले नाही अथवा कॉंक्रिटीकरण केले नाही. त्यामुळे दिव्यांश नाल्यात वाहून गेला, असे त्यांनी नमूद केले आहे.
|