अग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल

अग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल

मुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे. असे तंत्रज्ञान असलेल्या मोटोरोला कंपनीचे ५०० सेट अग्निशमन दल विकत घेणार आहे. ५०० सेटसह नवी यंत्रणा उभारणी आणि त्याच्या देखभालीसाठी ११ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

२०१५ मध्ये काळबादेवीमधील गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते. त्या दुर्घटनेनंतर नियुक्त केल्या गेलेल्या महापालिका समितीने अग्निशमन दलाची संदेशवहन यंत्रणा बदलण्याची शिफारस केली होती. सध्या वापरत असलेली व्हीएचएफ ॲनेलॉग यंत्रणा अग्निशमन दल १९६० पासून वापरत असून मुंबईच्या भौगोलिक रचनेत प्रचंड फरक पडल्याने ती तोकडी पडत आहे. काही नव्याने विकसित झालेल्या भागात तसेच उंच इमारतीत या यंत्रणेमुळे संपर्क होणे अवघड होते. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यात येणार आहे.

पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी नवी यंत्रणा खरेदी करण्यासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात ही नवी संदेशवहन यंत्रणा विकत घेण्यासाठीही तरतूद करण्यात आली होती.

अशी आहे नवी यंत्रणा
  हेडफोन लावून वापरता येणार असल्याने बचावकार्याच्या वेळी हात मोकळे राहणार
 जीपीएस लोकेशन मिळू शकेल
 एक मीटर पाण्यात 
३० मिनिटे राहू शकतो
 धूळ आणि जोरदार हवेचा परिणाम नाही
 वॉकीटॉकीवर एक बटण दाबून इमर्जन्सीचा संदेश पोहोचवता येऊ शकतो
 १४ ते १६ तास बॅटरी क्षमता

असा फायदा होईल
अनेक वेळा आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो. अशा वेळी कृत्रिम ऑक्‍सिजनचे सिलिंडर वापरून जवान आग नियंत्रणात आणण्याचे काम करतात. मात्र, धूर प्रचंड असल्याने आजूबाजूला काहीच दिसत नाही. त्यातच जुन्या वॉकीटॉकीमुळे अनेक वेळा संदेशवहनातही अडथळे येत होते. मात्र आता विनाअडथळा संदेश पोहोचवता येणार आहे. एखादा जवान अडचणीत असेल तर वॉकीटॉकीवरील एक बटण दाबून आपत्कालीन संदेश पाठवू शकेल. जीपीएसमुळे त्याचे स्थानही सहज मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com