नवी मुंबईत पुन्हा फुटबॉल विश्‍वचषकाची किक

नवी मुंबईत पुन्हा फुटबॉल विश्‍वचषकाची किक

मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली होती. त्यानंतर पुन्हा संघटना नवी मुंबईसाठी आग्रही आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दालनात मंगळवारी (ता. ९) याबाबत झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पोलिस आयुक्त संजय कुमार, मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि क्रीडा संचालनालयाचे संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्य सरकारने ‘नवी मुंबई यजमान शहर’ म्हणून ‘फिफा’शी करारही केला आहे. त्यानुसार बैठकीत सुरक्षा, निवास, सराव आदी विषयांवर चर्चा झाली. १७ वर्षांखालील मुलींची ही स्पर्धा असल्याने महापालिका आणि पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. २०१७ मध्ये नवी मुंबईला प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांच्या आयोजनाचा कोणताही अनुभव नसताना केवळ राष्ट्रीय सुरक्षा मानांकनांच्या माहितीनुसार महापालिकेने खबरदारी घेतली होती. नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ही स्पर्धा रंगली होती.

खेळाडूंना सरावाकरिता महापालिकेने खास आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करून घेतले आहे. गतवर्षी फिफाच्या अधिकाऱ्यांनी मैदानाची गुणवत्ता तपासल्यानंतर कौतुकही केले होते. स्वच्छ रस्ते, सुशोभित केलेले पदपथ, फिफाच्या संदेशाने रंगवलेले उड्डाणपूल, चौका-चौकांत तयार केलेल्या फिफा आणि फुटबॉलच्या प्रतिकृतींमुळे शहर फुटबॉलमय झाले होते. 


शहराची विकासवृद्धी
जागतिक स्तरावर राबवल्या जाणाऱ्या फिफा फुटबॉल विश्‍वचषकाच्या आयोजनामुळे परदेशी नागरिक नवी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे शहरातील हॉटेल आणि मॉल्सना परदेशी ग्राहक भेट देणार आहेत. तसेच शहरातील काही परिसर आवडल्यास परकी गुंतवणुकीला वाव मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासवृद्धीला चालना मिळेल, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com