कचऱ्याच्या मार्गावर हार्बर रेल्वे

कचऱ्याच्या मार्गावर हार्बर रेल्वे

मुंबई - नवी मुंबईला लोकलच्या माध्यमातून जोडणारा हार्बर रेल्वेमार्गही कचऱ्यातच गेला आहे. महापालिकेचा निधी मिळवून पावसाळ्यापूर्वी मार्गाची साफसफाई केली जात असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात येते; परंतु त्याचा काहीही फायदा होत नसल्याचे दिसते. दर पावसाळ्यात रेल्वेमार्ग पाण्याखाली जातात. वर्षभर हार्बर रेल्वे कचऱ्यावरूनच धावत असते.

कुर्ला-टिळकनगर ते पार मानखुर्द स्थानकांच्या दरम्यान अतिक्रमण करण्यात आलेल्या घरांमधून मध्य आणि हार्बर रेल्वेच्या पनवेलला जाणाऱ्या मार्गावर सांडपाण्याचा निचरा आणि कचरा थेट होतो. मार्गावर साचलेल्या कचऱ्यामुळे जनावरांचा तिथे मुक्त संचार होतो. त्यामुळे रेल्वे अपघाताचा धोका कायम आहे. रेल्वेमार्गावर संरक्षक भिंतही नसल्याने नागरिक रूळ ओलांडून प्रवास करत असतात. मार्गावरून जाणारे नागरिक जाता-येता आपल्या घरातील कचरा तिथेच भिरकावतात. त्यामुळे गटार तुंबत असून, प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यात हार्बर रेल्वेमार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सेवा ठप्प होते.

‘स्वच्छ रेल... स्वच्छ भारत अभियाना’चा रेल्वेने फार गाजावाजा केला. देशभरात स्वच्छ भारत अभियानाला पाच वर्षे होतील; पण अजूनही रेल्वेमार्गांवरील कचरा कमी झालेला नाही. रेल्वेमार्गाला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांमध्ये राजकीय नेते मते मागायला जातात; पण त्या वस्त्यांमधील अस्वच्छतेची दखल घेतली जात नाही, असेही आरोप होऊ लागले आहेत. वस्त्यांमध्ये पुरेशी शौचालये नसल्याने अनेक जण रेल्वेमार्गावरही प्रातर्विधी उरकतात. कचरापेट्या नसल्याने कचरा रेल्वेमार्गावर टाकला जातो. छोटे नाले नाही म्हणून सांडपाणीसुद्धा रेल्वेमार्गावर टाकले जाते, अशी स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना मात्र शून्य असल्याचे दिसून येते.

पनवेलहून रोज सीएसएमटीला नोकरीनिमित्त प्रवास करतो. पावसाळ्यात मात्र प्रवास अधिक त्रासदायक होतो. मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. प्लास्टिक कचरा आणि गटारातील घाण रेल्वेमार्गावर येते. त्यामुळे तातडीने रेल्वेमार्गाची स्वच्छता व्हायला पाहिजे. 
- श्रीकांत शेडगे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com