मुंबई - विचारवंत गौतम नवलखा यांनी नेहमीच नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे, असा आरोप राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. यासंदर्भातील काही पत्रे आणि नवलखा यांच्या लॅपटॉपमधील मजकुराचा उल्लेखही सरकारी वकिलांनी सादर केला.
शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले गौतम नवलखा यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात नवलखा यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेची सुनावणी मंगळवारी न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे झाली.
या प्रकरणातील अन्य आरोपींकडून मिळालेली काही पत्रे आणि नवलखा यांच्या लॅपटॉपमधील काही मजकुराचा उल्लेख त्यांनी केला.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या कटातही नवलखा यांचा सहभाग होता. त्या गटाचे ते सदस्य असल्याचे संबंधित पत्रांवरून दिसते. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला. याप्रकरणी उद्या (ता. 24) पुढील सुनावणी होणार आहे.
|