मुंबई - तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूयुक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला न्यायालयाने दिलासा दिला. त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात रेस्टॉरंट चालक अली रेझा अब्दी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
हुक्का पार्लरबाबत अद्याप राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली नाहीत. त्यामुळे कोणत्या आधारावर कारवाई केली जाते, असा प्रश्न याचिकादाराने उपस्थित केला होता. "शीशा स्कायलॉज' या नाममुद्रेने याचिकादाराची तीन रेस्टॉरंट आहेत.
|