‘एमटीएनएल’च्या आगीतून ८४ जणांची सुखरूप सुटका

मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला सोमवारी आग लागल्यानंतर धुराचे लोट बाहेर पडत होते.
मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला सोमवारी आग लागल्यानंतर धुराचे लोट बाहेर पडत होते.

मुंबई - वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) नऊ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आज दुपारी भीषण आग लागली. या आगीतून वाचण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर तसेच इतर मजल्यांवर पोचलेल्या तब्बल ८४ कर्मचाऱ्यांना स्नॉर्केजच्या साह्याने अग्निशमन दलाने बाहेर काढले. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अग्निशमन दलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. धुरात गुदमरल्याने सागर साळवे या जवानाला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रचंड धूर पसरलेला असल्याने अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेला रोबोचा वापर करण्यात आला. एमटीएनएल इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर दुपारी तीन वाजून आठ मिनिटांनी आगीची ठिणगी पडली. वातानुकूलित यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीची ठिणगी पडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्यालयातील लाकडी सामान, कागदपत्रांमुळे आग प्रचंड वेगाने परसली. त्याचबरोबर मोठा धूरही झाला होता. सुदैवाने या दोन्ही मजल्यांवरील कर्मचाऱ्यांनी आग भडकण्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या इमारतीत १०० च्या आसपास कर्मचारी अडकले होते. अग्निशमन दलाने गच्चीवरील तसेच वरच्या मजल्यांवरील ८४ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. स्नॉर्केजच्या मदतीने ही सुटका करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाने २० बंब, सहा जम्बो टॅंकरच्या साह्याने संध्याकाळी उशिरा नियंत्रण मिळाले. मात्र, कार्यालयांमध्ये प्रचंड धूर जमा झाला आहे. सुदैवाने एवढ्या मोठ्यात आगीत जीवित हानी झाली नसून गुदमरलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

...तरीही सेल्फी! 
गच्चीवर अडकलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला जवान स्नॉर्केजमधून खाली आणत असताना या महिलेला सेल्फीचा मोह आवरला नाही.  ही महिला सेल्फीसह या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करीत होती. तब्बल १०० फुटांवरून या महिलेला अग्निशमन दलाचे जवान जिवावर उदार होऊन खाली आणत असताना ही महिला सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे कॅमेऱ्यांमध्ये बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com