महामार्गावरील खड्डे मोजा; बक्षीस मिळवा! 

file photo
file photo

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून, अनेक अपघातही झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 31 जुलैला महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ऑगस्टला समारंभपूर्वक बक्षिसे प्रदान केली जातील.

चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे "देवेंद्र ते नरेंद्र महामार्ग' असे नामकरण, महामार्गावरील खड्ड्यांत रोपलागवड अशी अनोखी आंदोलने मनसेने यापूर्वी केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील खड्डे मोजण्याची स्पर्धा 31 जुलैला वडखळ नाका येथे होईल आणि 1 ऑगस्टला पळस्पे फाटा येथे बक्षीस वितरण समारंभ होईल, अशी माहिती रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिली.

खड्डे मोजण्याच्या स्पर्धेचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व रायगड जिल्ह्यातील आजी-माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत 31 जुलैला वडखळ नाका येथील आमंत्रण हॉटेलसमोर होईल. बक्षीस वितरण समारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 ऑगस्टला पळस्पे फाटा येथील श्री दत्त स्नॅक्‍ससमोर होईल, अशी कोपरखळी पोलसानी यांनी लगावली आहे. या महामार्गामुळे त्रस्त झालेले रायगड जिल्ह्यातील वाहनचालक, नागरिक व प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

मनःपूर्वक अभिनंदन व आभार 
"देवेंद्र ते नरेंद्र' मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे काम कित्येक पिढ्या सुसाट संथ गतीने चालले आहे. या महामार्गावर पहिल्याच पावसात सालाबादप्रमाणे छोटे-छोटे, मोठे-मोठे, गोल-गोल, मस्त-मस्त, छान-छान, त्रिकोणी, चौकोनी, काटकोनी आकाराचे खड्डे पडल्याने प्रवाशांना हवाई सफरीचा सुखद अनुभव येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कित्येकांना प्राणाचे बलिदान द्यावे लागले. तसेच कित्येकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे आपले, राज्य व केंद्र सरकारचे तसेच आपण नेमलेल्या ठेकेदाराचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार, असा टोला मनसेने पाठवलेल्या निवेदनात लगावला असून, गडकरी व शिंदे यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com