सांगली पालिकेची वॉटर वर्क्‍सची इमारत तात्काळ पाडा 

सांगली पालिकेची वॉटर वर्क्‍सची इमारत तात्काळ पाडा 

सांगली - शहरातील हिराबाग कॉर्नरजवळ असलेल्या महापालिकेच्या वॉटर वर्क्‍सच्या इमारतीस 60 वर्ष पुर्ण झाली आहेत. इमारतीची दुरवस्था झाली, असून ती धोकादायक बनली आहे. ही इमारत तात्काळ पाडा, असे स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या अहवालात म्हटले आहे. मात्र शहरातील इतर धोकादायक इमारती पाडण्याचे काम करणाऱ्या महापालिकेचे स्वत:च्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. 

महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील 411 इमारती धोकादायक ठरवल्या आहेत. त्यातील दहा इमारती पाडण्यात आल्या आहेत. जेसीबी लावून धोकादायक इमारती पाडण्यात येत आहेत. मात्र महापालिकेची स्वत:ची वॉटर वर्क्‍सची इमारत धोकादायक झाली आहे. त्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही. या इमारतीमध्ये पाणी पुरवठा विभाग आणि पाणी बिल भरणा विभागाचे अधिकारी, कर्मचारी काम करतात. पण इमारतीची दुरवस्था पाहिली की हे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत असे वाटते. 

वॉटर वर्क्‍सच्या या इमारतीस साठ वर्ष झाली आहेत. 1958 साली बांधण्यात आलेल्या या इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी तुटल्याचे दिसते. खिडक्‍याही तुटलेल्या आहेत. इमारतीच्या भिंती सतत पाण्यात भिजल्याने कमकुवत बनल्याचे जाणवते. खोल्यांची दुरवस्थाही ठळकपणे नजरेस येते. दरवाजेही कमकुवत झाले आहेत.

याबाबत महापालिकेच्या प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनासही या गोष्टी आणल्या आहेत. मात्र त्याची पाहणी करण्यापलिकडे काही घडलेले नाही. 

वयस्कर नागरिकांना त्रास 
वॉटर वर्क्‍सच्या या इमारतीमध्ये जलशुध्दीकरण केंद्र होते. ते बंद आहे. या ठिकाणाहून 58 हजार ग्राहकांना पाणी पुरवठा करणे, पाणीपट्‌टी आकारणे, तक्रार केंद्र, बिल भरणा केंद्र आदी विभाग आहेत. या ठिकाणी पाणी बिल भरणा करण्यासाठी रोज सुमारे दोनशेहून अधिक नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण वयस्कर, वृध्द असतात. दुसऱ्या मजल्यावरील बिल भरणा केंद्रात जिना चढून त्यांना जावे लागते. त्याचा त्रास सहन करत हे लोक बिल भरण्यासाठी जातात. त्यांची गर्दी असते. त्यामुळे या धोकादायक इमारतीबाबत महापालिकेने तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 

इमारत धोकादायक असल्याचा अहवाल 
या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या संस्थेकडून दोन वर्षांपुर्वी करुन घेतले आहे. त्यांनी ही इमारत धोकादायक बनल्याचा अहवाल दिला आहे. इमारतीची दुरुस्ती शक्‍य नसून इमारत पाडण्याचा तांत्रिक सल्ला दिला आहे. पाणी पुरवठा विभागाची दुसरीकडे सोय करुन तातडीने इमारत पाडण्याची गरज आहे. मात्र हा विभाग कोठे हलवायचा यातच वेळ जात आहे. काही महिन्यांपुर्वी महापौर संगीता खोत, माजी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी या इमारतीची पाहणी केली होती. मात्र त्यावर अजून कार्यवाही झालेली नाही. 

एखाद्या शाळेत सोय करा 
पाणी पुरवठा विभाग तातडीने हलवण्याची गरज आहे. महापालिकेच्या काही शाळांच्या खोल्या रिकाम्या आहेत, तेथे हा विभाग तात्पुरता हलवावा. त्याच ठिकाणी बिल भरणा केंद्राचीही सोय करण्याची गरज आहे. बिल भरण्यास येणारे वयस्कर नागरिक लक्षात घेता भरणा केंद्र खालच्या मजल्यावर असावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com