शिवसेनेसाठी भावाचा पराभव केला

शिवसेनेसाठी भावाचा पराभव केला

कोल्हापूर - ‘ताकाला जाऊन मोगा लपविणारा मी नाही, माझ्याकडे बोट दाखवायचे नाही. शिवसेनेसाठी चुलत भावाचाही मी पराभव केला आहे,’ अशा शब्दांत आमदार चंद्रदीप नरके यांनी आज भावनांना वाट मोकळी करून दिली. काही लोकांमुळे गेल्या निवडणुकीत विजय हुकला. त्यांची नावे जाहीर करण्याची माझी तयारी आहे. यापुढे कुणी गद्दारी केली तर रावतेसाहेब, त्याला शिक्षा द्या, तरच सेनेचा खासदार होईल, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलेले वक्तव्य यामुळे सेनेचा गटप्रमुख आणि बीएलएचा मेळावा आज चांगलाच गाजला.

रामकृष्ण हॉलमध्ये मेळावा झाला. परिवहनमंत्री दिवाकर रावते, अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.

सुरवातीला शांत वाटणारे नरके अचानक आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘‘प्रा. संजय मंडलिक यांची निवडणूक ही आमची निवडणूक आहे. त्यांच्याविषयी सकारात्मक बाबी आहेत त्या सांगत चला. ‘ताकाला जाऊन, मोगा लपविणारा’ (संजग घाटगे यांच्याकडे पाहून बाबा असा उल्लेख करत) मी कार्यकर्ता नाही. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीत ‘करवीर’मधून ८५ हजार मते दिली होती. ज्यांना तिकडे जायचे आहे त्यांनी आजच जायचे आहे. माझ्यासोबत थांबायचे नाही. 

जिल्हा दूघ संघाचा (गोकुळ) प्रसार डेअरीपर्यंत झाला आहे. त्यांचे सुपरव्हायझर प्रचारात असतात. सहकारी संस्थेतील एकही कर्मचारी प्रचारात दिसता कामा नये, गोकुळ मल्टीस्टेटला विरोध केला. जनरल सभा हाणून पाडली. आपल्यातही काही झारीचे शुक्राचार्य आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यापुढे असे चालणार नाही. गाठ माझ्याशी आहे.

- चंद्रदीप नरके, आमदार

सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा प्रा. मंडलिक यांनी जबाबदारीने चालविला आहे. मतदारसंघात ज्यांचे दर्शन होत नाही ते आता पैशाचा आणि प्रलोभनाचा वापर करू लागले आहेत. त्यांच्याकडे कोण जात आहे ते तपासा. मंडलिक यांच्या विजयाची चंद्रकांत पाटील यांची जबाबदारी महत्वाची आहे.
तत्पुर्वी, झालेल्या भाषणात संजय पवार यांनी गद्दारांवर बोट ठेवले. ज्यांच्यामुळे गेल्यावेळी तोंडचा घास गेला त्यांची नावे जाहीर करण्याची माझी तयारी आहे. साट्यालोट्याचे राजकारण आणि यापुढे गद्दारी केली तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. तसे झाले तरच सेनेचा खासदार होईल. ज्यांच्या जोरावर आमदार होतो त्या शिवसैनिकांना कुणी विसरू नये,असे ठणकावले.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘जिथे असाल तेथे निष्ठेने राहायचे. निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी भुदरगड तालुक्‍यात उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्साह मतपेटीत बंद होईपर्यंत कायम ठेऊ, भगव्या विचारांचीच सीट संसदेत गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करूया.’’

माजी आमदार संजय घाटगे यांनी प्रा. मंडलिक मताधिक्‍याचे सर्व विक्रम मोडीत काढतील, असे सांगून मी जे काही आहे ते स्पष्ट बोलतो अन्यथा नकार तरी देतो असे स्पष्ट केले.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीत पराभव झाला तरी काम करत राहिलो. ते इकडे येणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र एकदा ते पळून गेले आहेत त्यामुळे पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपण सहाशे गावांचा संपर्क दौरा पूर्ण केला पण त्याची जाहिरात कधी केली नाही. सध्या साड्या वाटल्या जात आहेत. त्या कष्टाच्या पैश्‍यातून वाटल्या असत्या तर ठिक होत्या. हा तर ‘गोकुळ’चा आणि पर्यायाने दूध उत्पादकांचा पैसा असल्याचे सांगितले. भाजपचे जे कार्यकर्ते आपला प्रचार करणार नाहीत अशा पन्नास ते साठ जणांची यादीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. एक तर प्रचार करा अन्यथा करणार नाही, असे तरी सांगा, असे स्पष्टीकरण या कार्यकर्त्यांना घेतले जाणार आहे.’’

संपर्कप्रमूख अरुण दुधवडकर म्हणाले, ‘‘गढळू पाणी स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. शिवसेना भाजपचा एकत्रित मेळावा लवकरच होईल. त्यासंबंधी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे. शिवसेना प्रमूखांचे कोल्हापूरवर प्रेम होते आणि कोल्हापुरकरांचे शिवसेनेवर प्रेम आहे. त्यामुळेच सहा आमदार जिल्ह्याने दिले. संजय मंडलिक यांनी आमदार अमल महाडिक तसेच शिवसेना आमदार सोबत घेऊन काम करावे. रात्र वैऱ्याची आहे. शरद पवार यांनी कालच माढ्यातून माघार घेतली. कोल्हापुरच्या राष्ट्रवादीच्या खासदारांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे.’’  महिला संघटक संजोती माळवीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार क्षीरसागर गैरहजर
आजचा मेळावा सहाही विधानसभा मतदारसंघांतील गटप्रमुखांचा होता. त्यास शहरचे आमदार राजेश क्षीरसागर गैरहजर राहिले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या पुढाकारातून मेळावा झाला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अंबाबाई मंदिराचा संदर्भ देत क्षीरसागर यांनी मानदंड उचलला होता की नाही? अशी विचारणा पवार यांना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com