आरोप प्रत्यारोपांनी शिरोळच्या दत्त कारखान्याचे कार्यक्षेत्र ढवळले

आरोप प्रत्यारोपांनी शिरोळच्या दत्त कारखान्याचे कार्यक्षेत्र ढवळले

कुरुंदवाड - शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनेल व संस्थापक परिवर्तन पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दत्तच्या १२३ गावांच्या कार्यक्षेत्रातील २५ हजार सभासद २७ जुलैला नवे कारभारी निवडणार असून, निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पॅनेलच्या नेतेमंडळी उमेदवार व  कार्यकर्त्यांनी गावोगावी भेटीगाठींसह प्रचार सभांचा धडाका लावला आहे.

गैरकारभार कथित भ्रष्टाचारासह आरोप प्रत्यारोपांनी दत्तचे कार्यक्षेत्र ढवळून निघाले आहे. दत्त कारखान्याचे सर्वेसर्वा दिवंगत माजी आमदार आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पश्‍चात पहिल्यांदाच अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहेत. भाजपचे युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक परिवर्तन पॅनेलचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

दत्त कारखाना म्हणजे सा. रे पाटील असे गेल्या ३०-३५ वर्षाचे समीकरणच. अनेक वर्षे प्रचंड सत्ता संघर्षातही सा. रे. पाटील यांनी दत्तच्या सत्तेवर पक्की मांड ठेवली होती. ऊस दराचा संघर्ष असो वा वार्षिक सर्वसाधारण सभेतील अभूतपूर्व गोंधळ असो त्याला नाट्यमय कलाटणी देण्याचे कौशल्य सा. रे पाटील यांच्याकडे होते.

सर्व संघर्षाला ते पुरून उरले त्यामुळेच गतवेळची निवडणूक बिनविरोध करण्याची किमया त्यांना साधता आली. त्यांचेच वारसदार गणपतराव पाटील यांच्याकडे दत्तचे नेतृत्व आहे. यंदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्‍यता असतानाच दत्त व्यवस्थापनाचे जुने विरोधक सुरेश शहापुरे, दस्तगीर बाणदार, डॉ. सी. डी. पाटील, भालचंद्र कागले आदींनी दत्तमधील कथित गैरव्यवहाराचे मुद्दे उपस्थित करत अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या विरोधात रान उठवले. त्यांना शिरोळ नगरपालिका निवडणुकीत गणपतराव पाटील यांनी विरोध केल्याने व नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थोडक्‍यात पराभूत झालेले पृथ्वीराज यादव यांचीही रसद मिळाली व संस्थापक विरोधकांचे पॅनेल आकारास आले.

सत्तारूढ आघाडीने मृत संचालकांच्या जागी चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, उर्वरित जुनीच टीम कायम ठेवली आहे. सत्तारूढ आघाडीकडे गणपतराव पाटील यांचे नेतृत्व असून, भाजप नेते अनिल यादव, शेखर पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाठबळ व  सा. रे. पाटील गटाच्या कट्टर समर्थकांची स्वतंत्र यंत्रणा आहे.

वेळेत ऊस बिले, थेट संपर्क, कर्नाटकातील सभासदांचे भरभक्कम पाठबळ, ऊसविकास योजना, क्षारपड जमीन सुधारणा योजना, तालुका संघ, जयसिंगपूर उदगाव बॅंक यासह दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून उभे राहिलेले गावागावांतील कार्यकर्त्यांची फळी जमेच्या बाजू आहेत. कारखान्यासह दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून उभे केलेले 
काम अध्यक्ष पाटील प्रचारात मांडताना दिसताहेत.

विरोधी आघाडीने ऊर्जाकूंरमधील कथित घोटाळा, सोयाबीन कारखान्याचा मुद्दा उपस्थित करीत अध्यक्ष गणपतराव पाटील यांनाच लक्ष्य केले आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती, रिफायनरी प्रकल्प, आरोग्य केंद्र, पॉलिटेक्‍निक कॉलेजवरील खर्चासह विविध मुद्द्यांवरून आरोपाच्या फैरी झडत आहेत. आंदोलन अंकुश, रयत क्रांती संघटना यांचेही बळ विरोधकांना आहे. 

यादव विरुद्ध यादव
दत्तच्या रणांगणावर यंदा यादव विरुद्ध यादव अशी चुलत्या पुतण्याची लढाई पाहायला मिळत आहे. दत्तचे ज्येष्ठ संचालक व भाजप नेते अनिल यादव सत्तारूढ आघाडीसोबत असून, त्यांचेच पुतणे भाजपचे युवा नेते पृथ्वीराज यादव विरोधी संस्थापक परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करताहेत. दोघेही निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणूक कारखान्याची; पूर्वतयारी विधानसभेची
गणपतराव पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीत करत आहेत. काँग्रेसकडून लढण्याचा त्यांचा इरादा आहे. कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना गावागावापर्यंत आधीच पोहोचायची संधी मिळाली असून, निवडणूक कारखान्याची असली एकप्रकारे पूर्वतयारीची संधी त्यांना मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com