शिवसैनिक फाटका नव्हे, फटके देणारा

शिवसैनिक फाटका नव्हे, फटके देणारा

कोल्हापूर - ‘आम्ही बिनपैशाचे आहोत; पण बिनकामाचे नाहीत. शिवसैनिक फाटका नव्हे, तर फटके देणारा आहे,’ अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भूमिका स्पष्ट केली. रामकृष्ण हॉल येथे आयोजित गटप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अन्य वक्‍त्यांनी व्यासपीठावरून भाषण केले; मात्र श्री. रावते यांनी व्यासपीठावरून खाली येऊन गटप्रमुखांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शिवसैनिक आहेत; तोपर्यंत केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही, यावर शिवसेनाप्रमुखांचा विश्‍वास होता. पैसैवाल्यांना मोह आवरत नाही. आम्ही बिनपैशाचे आहोत; पण बिनकामाचे नाहीत. शिवसैनिक फाटका नाही, तर तो फटके देणारा आहे. बूथप्रमुखांची निर्मिती काही कागदपत्रे तयार करण्यासाठी केलेली नाही.

शिवसेना-भाजपशिवाय दुसरा पक्ष असणार नाही, यासाठी कामाला लागा. निवडणुकीच्या काळात बुद्धिभेदाचा प्रयत्न होतो; त्यासाठी सावध राहा. बुद्धिभेद चुकीचे वातावरण तयार करतो. या काळात व्हॉटस्‌ ॲप बंदच करून टाका. जनतेत विश्‍वास निर्माण केल्यास विजय निश्‍चित होतो. महिला गटप्रमुखांनी मतदारभगिनींच्या चुलीपर्यंत जावे. त्यांची समजूत काढली, की भल्या त्या काँग्रेस विचाराच्या असल्या, तरी शिवसेनेलाच मतदान करतील.’’

वैयक्तिक टीका टाळा!
‘प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी बरीच मंडळी आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या काळात वैयक्तिक टीका टाळा,’ असा सल्ला रावते यांनी दिला. मेळाव्यानंतर उपजिल्हा प्रमुखांशी त्यांनी संवाद साधला. उद्यापासून मतदानापर्यंतचे नियोजन करा. मंडलिक यांचा रोजचा दौरा कसा असेल, याचे वेळापत्रक सेनेच्या कार्यालयात लावा. आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांनी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

सदाशिवराव मंडलिक यांचा संदर्भ देत श्री. रावते म्हणाले, ‘‘मंडलिक कोल्हापूरचा आवाज होते. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. पैसे नसलेले; पण संघर्षातून मोठे झालेले व्यक्तिमत्त्व होते. जी गोष्ट पटली नाही, ती त्यांनी ठामपणे सांगितली. ’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com