सोलापूरच्या गुरुजींना पुन्हा ड्रेसकोड 

teacher
teacher

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करणाऱ्या गुरुजींना पुन्हा ड्रेसकोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (ता.19 ) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य सचिन देशमुख यांनी मांडलेल्या मुद्याला सभागृहाने एकमताने मान्यता दिली. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुरुजी आता गणवेशामध्ये दिसतील. 

10 वर्षांपूर्वी तत्कालीन उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विक्रांत पाटील यांनी गुरुजींना ड्रेसकोड लागू केला होता. जोपर्यंत ते सभापती होते, तोपर्यंत ड्रेसकोडचा निर्णय चालू राहिला. मात्र, मागील पाच वर्षांत याकडे तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी फारशा गांभीर्याने न पाहिल्याने तो निर्णय बारगळला होता. पण, आजच्या सर्वसाधारण सभेत सांगोल्याचे सदस्य सचिन देशमुख यांनी गुरुजींना ड्रेसकोड करण्याचा मुद्दा सभागृहात मांडला. त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. त्याच वेळी सभागृहात उपस्थित असलेले विक्रांत पाटील यांनीही हा विषय चांगला असल्याचे सांगत आपण घेतलेल्या निर्णयाकडे मागील पाच वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे सांगितले.

गुरुजींच्या गणवेशाचा रंग कसा असावा, याबाबतही चर्चा झाली. मागील वेळी असलेला रंग कायम ठेवावा, असे विचार काही सदस्यांनी मांडले. तर याबाबत सर्वांनी बसून निर्णय घेण्याचा मुद्दा काही सदस्यांनी मांडला. अनेक शिक्षक आपल्या घरापासून दूरच्या शाळेवर काम करतात. वाहनाची सोय नसलेल्या ठिकाणी गुरुजींना कुणाच्यातरी गाडीवर बसून जावे लागते. त्या वेळी त्यांच्या अंगावर गणवेश असेल तर ते त्वरित ओळखू येतील व सर्वसामान्य नागरिकही गुरुजींचा आदर करत त्यांना शाळेवर सोडण्यास मदत करतील, अशी भावना ड्रेसकोड लागू करण्यामागे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

चोपडे, कांबळे यांची होणार चौकशी 
दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे व बार्शीचे गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची चौकशी करण्याची मागणी अनुक्रमे उमेश पाटील व किरण मोरे यांनी आजच्या सभेत केली. चोपडे यांनी महिला शिक्षकांबद्दल वापरलेली भाषा व कांबळे यांनी पंचायत समिती सदस्यांचा केलेला अनादर यामुळे त्यांची चौकशी करून तसा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष संजय शिंदे यांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना दिल्या. श्री. चोपडे यांच्याकडील पदभार काढण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com