नगरपालिकेच्या धोरणांमुळे धुमसतोय "कचरा' 

नगरपालिकेच्या धोरणांमुळे धुमसतोय "कचरा' 

सातारा - सातारा नगरपालिकेने जमा केलेला कचरा गेली चार दशके सोनगाव डेपोत टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे ठोस धोरण अद्यापपर्यंत अंमलात आलेले नाही. त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडीतील ग्रामस्थ सहन करत आहेत. कालपासून (ता.11) या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मात्र, त्यातून तरी पालिकेचे सत्ताधारी, प्रशासनाला जाग येणार का? हा प्रश्‍नच आहे. 

सातारा पालिकेसह शाहूनगर, शाहूपुरीसह उपनगरांतील कचरा पालिका मालकीच्या सोनगाव येथील कचरा डेपोत टाकला जातो. चार दशके येथे कचरा पडत असल्याने कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक प्रस्ताव तयार झाले. मात्र, ते कागदावरच राहिले. कचऱ्याचा प्रश्‍न केवळ "धुमसत'च राहिला आहे. शहरातील कचऱ्याबरोबरच भटकी मृत जनावरेही सोनगाव डेपोत नेऊन टाकली जातात. खरकटे, तसेच कचऱ्यातील घाण टिपण्यासाठी कावळ्यांचे थवे उडताना दिसतात. कुजलेले अन्न, मांसामुळे दुर्गंधी पसरते. शहर व उपनगरांतील कचरा असला तरी त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडी, डबेवाडी, शहापूर या गावांतील ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. त्याविरोधात सोनगाव ग्रामस्थांनी अनेक निवेदने दिली, आंदोलने केली. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना झाली नाही. त्यामुळे कालपासून या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत डेपोत येणारा घंटागाडीतील कचरा थोपवून धरला आहे. 

प्रकल्पाची धिमी गती 
कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणाऱ्या प्रकल्पासाठी आठ महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु, त्यापासून त्याचे शेड उभारणीचेच काम सुरू आहे. इतक्‍या धिम्या गतीने कामकाज सुरू ठेवले तर हा प्रकल्प अंमलात कधी येणार, याविषयी साशंकता उभी राहत आहे. 

का पेटतो कचरा? 
सध्या दिवाळीतील फटाक्‍यांचा कचरा डेपोमध्ये टाकला गेला आहे. अर्धवट जळलेले फटाके उष्णतेमुळे पेट घेतात. शिवाय ढिगाऱ्याच्या खालच्या स्तरावर गाडला गेलेला ओला कचरा कुजून तयार झालेला मिथेन हा वायू सुका कचरा पेटविण्यास साह्यभूत ठरत आहे, अशी माहिती "आस्था' सामाजिक संस्थेचे विजयकुमार निंबाळकर यांनी दिली. 

...असे होताहेत दुष्परिणाम 
- घसादुखी, डोळ्यांची जळजळ 
- खोकला, सर्दी, तापाची साथ 
- धुरामुळे व्यवस्थित झोप लागत नाही 
- लहान मुले धुराच्या त्रासामुळे रडतात 
- महिला, वृद्धांना श्वसनाच्या आजारांचा प्रादुर्भाव 
- पावसाळ्यात माशांचा त्रास 
- शेती उत्पादन घटले, शेती नापिक होण्याचा धोका 
- कचरा डेपोमुळे गावातील जमिनी विक्रीचा दरही कमी 
- नवीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेताना ग्राहकांची टाळाटाळ 

आकडे बोलतात... 
दररोज कचरा संकलन- 70 टन 
घंटागाड्या- 42 
ट्रॅक्‍टर- 5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com