‘गोकुळ’ मल्टिस्टेट झाल्‍यास कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक राजकारण बदलणार -

‘गोकुळ’ मल्टिस्टेट झाल्‍यास कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक राजकारण बदलणार -

कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी संचालक मंडळ आग्रही आहे. संघाच्या नेत्यांनी व संचालकांनी संघ मल्टिस्टेट करण्याचा चंग बांधला आहे. आतापर्यंत गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघ असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय नव्याने जिल्हा किंवा तालुका दूध संघ काढता येत नव्हता. मात्र ‘गोकुळ’ मल्टिस्टेट झाल्यानंतर जिल्हा दूध संघासह अनेक तालुका दूध उत्पादक संघांची स्थापना होणार आहे. त्यामुळे मल्टिस्टेटवरून जिल्ह्यात ‘कहीं खुशी, कहीं गम’ पाहायला मिळत आहे. परिणामी, जिल्ह्याचे आर्थिक राजकारण बदलण्याची शक्‍यता आहे. 

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव येणाऱ्या सर्वसाधारण सभेत संघाकडून केला जाणार आहे. ठराव करण्यासाठी ‘गोकुळ’चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील व खासदार धनंजय महाडिक आग्रही आहेत. तर हा ठराव होऊ नये म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार के. पी. पाटील प्रयत्नशील आहेत. ‘गोकुळ’वरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. दोन्ही बाजूकडून ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटचे फायदे आणि तोटे सांगितले जात आहेत.

‘गोकुळ’ हा जिल्हा दूध उत्पादक संघ आहे. त्यामुळे या संघाची मान्यता घेतल्याशिवाय तालुका संघ काढता येत नाही. तसेच जिल्हा दूध संघ काढण्यासाठी ‘गोकुळ’चा ना हरकत दाखला आवश्‍यक आहे. मात्र, जिल्ह्यात कोणताही तालुका संघ स्थापन करू नये, अशी याचिका ‘गोकुळ’ने न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे कधी शेतकरी कंपनी काढून, खासगी कंपनी अथवा संस्था स्थापन करून किंवा मल्टिस्टेटच्या माध्यमातून दूध संघ सुरू केले आहेत. जर गोकुळ मल्टिस्टेट झाला तर मात्र नवीन जिल्हा व तालुका दूध संघ काढण्यासाठी ‘गोकुळ’च्या परवानगीची गरज उरणार नाही. परिणामी, महाडिक व गोकुळला शह देण्यासाठी जिल्ह्यात अनेक जिल्हा व तालुका संघ निघू शकतात, असा सूर विरोधी गटातून उमटू लागला आहे.

‘गोकुळ’ मल्टिस्टेट होणे ही वेदनादायी आहे. संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर सहकारी संस्थांचे महत्त्व संपणार असून, व्यक्‍ती सभासद होणार आहेत. ‘गोकुळ’ची मक्‍तेदारी असल्यानेच आम्हाला शेतकरी कंपनी काढावी लागली, अन्यथा आम्ही मागेच तालुका दूध उत्पादक संघ काढला असता. जर गोकुळ मल्टिस्टेट झाला तर आम्ही स्वाभिमानी तालुका दूध उत्पादक संघ काढणार आहे. आमच्या शेतकरी कंपनीचे सहकारात रूपांतर करण्यासाठी परवानगी मागणार आहे.
- खासदार राजू शेट्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com