संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चा

संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चा

गोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक 

जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात?
महाडिक  - गोकुळ दूध संघाला सुरुवात होऊन ५५ वर्षे झाली आहेत. संघ सुरू झाला तेव्हा ६५० लिटर दूध संकलन होते. त्यानंतर संघाचा व्याप वाढत गेला. आज हेच संकलन १४ लाख ५७ हजार लिटर आहे. सरासरी १२ लाख लिटर संकलन होत आहे. वार्षिक संकलन ४२ कोटी लिटर्सवर असून २२०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. साडेसहा लाख दूध उत्पादकांचा संघ आहे. साडेतीन हजार कर्मचारी या संघात काम करतात. रोज संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात ४ कोटी रुपये येतात. साखर उद्योग अडचणीत आला की दूध उद्योगच मदतीचा हात देतो. गोकुळच्या दुधाला मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी संघ मल्टिस्टेट करत आहोत. गोकुळचे नाव देशात करायचे आहे, यासाठीच हा निर्णय घेण्यात येत आहे.

मल्टिस्टेटवरून विरोध का?
महाडिक : आज जागतिक स्पर्धा वाढली आहे. त्यानुसार वाटचाल करणे आवश्‍यक आहे. जे संघ काळानुसार बदलले नाहीत, ते बंद पडले आहेत. म्हणूनच आम्ही जिल्हा संघ मल्टिस्टेट करण्यासाठी निघालो आहोत, मात्र याला काही मंडळी विरोध करत आहेत. आज जे  गोकुळच्या मल्टिस्टेटला विरोध करत आहेत, त्यांना या विषयावर बोलायचा नैतिक अधिकार नाही. गोकुळमधून बाहेर काढलेल्यांना यावर बोलायचा अधिकार नाही. तसेच ज्यांना गोकुळची सत्ता मिळाली नाही म्हणून महालक्ष्मी दूध संघ काढला आणि बंद पाडला. त्यांनाही ‘गोकुळ’वर बोलायचा अधिकार नाही. त्यातूनही जे विरोध करत आहेत, त्यांनी ही एकदा गोकुळची सत्ता का हवी आहे, हे एकदा जाहीरच करावे.

महाडिकांना संघ ताब्यात ठेवायचा आहे?
महाडिक  ः अत्यंत दिशाभूल करणारा आरोप विरोधक करत आहेत. संघातून हाकलून काढले म्हणून त्यांच्याकडून द्वेष पसरवला जात आहे. मला काही याचा फरक पडत नाही. आमचे दोन साखर कारखाने आहेत. डिस्टिलरी आहे. हजार-बाराशे कोटी रुपयांची उलाढाल आम्ही करतो. आम्हाला याची काही गरज नाही. आम्हाला विरोध करणाऱ्यांनाच सत्ता हवी आहे. स्वत: संघ काढून आणि ते बंद पाडून आता आम्हाला हे ब्रह्मज्ञान सांगायला निघाले आहेत. 

संघ मल्टिस्टेट झाला नाही तर?
महाडिक  : पूर्वी सर्वच संघ दूध विकत होते. काळ बदलत गेला. वेगवेगळ्या उपपदार्थांची मागणी होऊ लागली. त्यानुसार त्यांची निर्मिती होऊ लागली. जर मागणीप्रमाणे आपण पुरवठा केला नाही तर संघ अडचणीत येईल. अमूल सारख्या दूध संघाला टक्‍कर द्यायची झाली तर आपणाला त्यांच्याबरोबरीनेच रहावे लागेल. गोकुळने जर हे बदल स्वीकारले नाहीतर संघ बॅकफूटवर जाईल.

सर्वसाधारण सभेत लोकशाही ठेवणार का?
महाडिक  ः देशात हुकूमशहांचे काही चालत नाही. कोठेच हुकूमशाही चालत नाही. मात्र तुम्ही जसे वागाल तसेच प्रतिसाद मिळणार. समोरचा कसा वागेल, तसे मी वागणार. समोरच्याने हात दिला तर मी हात देणार. मात्र वाद हा तत्त्वाचा असला पाहिजे. केवळ विरोधाला विरोध म्हणून चुकीचे काही चालणार नाही. 

संचालकांच्या सोयी सुविधांवर आक्षेप आहे?
महाडिक  ः संघाच्या संचालकांची १० लाखांची गाडी घेण्याची ऐपत नाही का? तो घेऊ शकतो. मात्र, ते संघाचे काम करत आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ते जात आहेत. त्यामुळे त्यांना गाडी आणि चालक दिलेले आहेत. कोणाच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही.

ताकदीनिशी विरोधच - सतेज पाटील 

मल्टिस्टेटबाबत तुमची भूमिका काय?
सतेज पाटील : गोकुळ दूध संघ जिल्हा दूध संघ म्हणून स्थापन केला आहे. शासनाने याला सर्वतोपरी मदत केली आहे. संघाचे अस्तित्व राहावे म्हणून न्यायालयीन लढाई सुरू आहे. असे असताना अचानक मग मल्टिस्टेटचा घाट का, असा प्रश्‍न दूध उत्पादकांसह  सर्वांना पडला आहे. आजही जिल्ह्यातील पन्नास टक्‍के दूध संकलन होत नाही. त्यामुळे कोणाच्यातरी व्यक्‍तीगत फायद्यासाठी  मल्टिस्टेटचा घाट घालण्यात आला आहे. तो आपण कदापि यशस्वी होऊ देणार नाही. सर्वसाधारणसभेत यावर बोलूच, प्रसंगी न्यायालयात जाऊन या मल्टिस्टेटला कडाडून विरोध करू.

मल्टिस्टेटला विरोध का? 
सतेज पाटील  : पुरेसे दूध व हक्‍काने दूध मिळत नसल्याने संघ मल्टिस्टेट करत असल्याचा डांगोरा पिटला जात आहे, मात्र त्यात काही तथ्य नाही. गोकुळ दूध संघ गेली दहा वर्षे परराज्यातून दूध खरेदी करत आहे. कर्नाटक, गुजरातसह शेजारील सांगली जिल्ह्यातूनही संघाला दूध येते. हे दूध आणताना कोणी आडवले आहे का? आजही जिल्ह्यातील ५० टक्‍के दुधाचे संकलन होत नाही, अशी परिस्थिती असताना मग मल्टिस्टेटची गरजच काय? मल्टिस्टेट करूनही म्हशीचेच दूध मिळेल, याची खात्री नाही. केवळ मल्टिस्टेटचे कारण पुढे करत संघाचे खासकीकरण करण्याचाच हा डाव आहे. गतनिवडणुकीत काटावरची सत्ता मिळाली आहे. ही सत्ता हातून जाऊ नये व हा दूध संघ स्वतःच्या ताब्यात राहावा, यासाठी मल्टिस्टेटचा उद्योग सुरू आहे.

संघ मल्टिस्टेट झाला तर काय धोका आहे?
सतेज पाटील  : ज्यांनी हा दूध संघ वाढविला त्यांच्या हक्‍कावर गदा येणार आहे. सभासदांना कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. दाद मागता येणार नाही. जो संघ २०० किलो मीटरवर असणाऱ्या राज्य शासनाला विचारत नाही, तो २ हजार किलोमीटर दूर असलेल्या दिल्लीतील शासनाचे ऐकेल का? त्यामुळे दूध उत्पादकांचे हित जोपासले जाणार नाही. त्यांना कोणीही दाद देणार नाही. संघ  मल्टिस्टेट झाला तर येलूर गावचे एक हजार व्यक्‍ती सभासद करतील. त्यामुळे भविष्यात निवडणूक घेण्याची गरजच पडणार नाही. असं काही  होऊ नये म्हणूनच या मल्टिस्टेटला विरोध आहे.

संघाच्या नेत्यांना काय आवाहन कराल?
सतेज पाटील  : मी, आमदार मुश्रीफ व आमदार नरके या सभेस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे लोकशाहीवर विश्‍वास असेल, तर सभास्थानी असणारी अर्धी जागा बसण्यास द्यावी. आम्हाला आमचे मत मांडण्यास द्यावे. आमच्या बोलण्यात काही अडथळा आणू नये. बगलबच्च्यांना पुढे बसवून काही घोषणाबाजी करून ठराव मंजुरीची गडबड करू नये, असे झाले तर न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. 

पी. एन. यांच्याकडून काय अपेक्षा आहे?
सतेज पाटील  ः संघात व्यक्‍ती सभासद करण्याचा प्रयत्न झाला तर आपण बाहेर पडू, असे पी. एन. पाटील सांगत आहेत, मात्र मल्टिस्टेटचा भूमिका पटत नसेल, तर त्यांनी आत्ताच माघार घ्यावी. खरं तर पी. एन. हे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांना जनतेकडून मल्टिस्टेटला विरोध असल्याचे दिसत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर एक वर्षभर ते हा निर्णय स्थगित ठेवतील. याबाबत लोकांचा, दूध उत्पादकांचा विश्‍वास संपादन करतील. मग पुढच्या जनरल बॉडीला हा विषय आणतील, अशी अपेक्षा होती; मात्र तसे त्यांनी का केले नाही, हे मला समजत नाही. 

मल्टिस्टेट म्हणजे दावं नसलेले जनावर - हसन मुश्रीफ

गोकुळच्या सत्तेत असताना मल्टिस्टेटला विरोध का?
मुश्रीफ ः  मी गोकुळच्या सत्ताधारी पक्षाचा नेता नाही. काही अपरिहार्य कारणास्तव व रणजितसिंह पाटील यांच्यासाठी गोकुळच्या सत्ताधारी गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, मात्र निवडणुकीनंतर गोकुळच्या नेत्यांची आणि माझी भेट झालेली नाही. सत्तेत आहे, म्हणून चुकीच्या गोष्टींना सहकार्य करणे आपल्याला जमत नाही. जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट होणे, हे धोकादायक आहे. गोकुळ ही जिल्ह्याची अस्मिता आहे. म्हणूनच गोकुळला मल्टिस्टेट करण्यापासून रोखण्यासाठी आपण ताकदीने लढत आहोत.

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचे कारण काय?
मुश्रीफ ः गोकुळ हे सत्तेचे केंद्र आहे, मात्र या सत्ताकेंद्राला घरघर लागली आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी पाहूनच गोकुळला मल्टिस्टेट करण्याची औदसा नेत्यांसह संचालकांना सुचली आहे. मी दुग्धविकासमंत्री होतो. दूध हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे परराज्यातून दूध आणण्यासाठी मल्टिस्टेट करण्याची गरज नाही, हे आपणाला माहिती आहे, मात्र यांना दुधाची व उत्पादकांची काळजी नसून केवळ सत्ता टिकवण्यासाठी मल्टिस्टेटचा खेळ सुरू केला आहे.

गोकुळला शासकीय मदत आहे की नाही?
मुश्रीफ ः गोकुळला कोणतीही शासकीय मदत नसल्याचा बडेजाव संघाचे नेते व अधिकारी मारत आहेत, मात्र ती वस्तुस्थिती नाही. गोकुळला जिल्हा दूध संघ मान्यता देत असताना शासकीय दूध डेअरी बंद करून ही मान्यता दिली आहे. ताराबाई पार्क येथील गोकुळचे कार्यालय आहे, ती जागा शासनाने दिली आहे. त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी संघाला शासनाने जागा दिली आहे. एनडीडीबीकडूनही गोकुळला विविध प्रकल्पांना पैसे मिळतात. असे असताना शासकीय मदत मिळत नसल्याचे सांगून संघाकडून धूळफेक केली जात आहे. 

गोकुळच्या नेत्यांना काय आवाहन करणार?
मुश्रीफ ः गोकुळचे मल्टिस्टेट होणे, ही धोक्‍याची घंटा आहे. ते खासगीकरणाकडे टाकलेले पाउल आहे. मल्टिस्टेटचे चांगले उदाहरण हा दौलत सहकारी साखर कारखाना आहे. तीनवेळा लिलाव करण्याची वेळ आली आहे, मात्र अजूनही या कारखान्याचे लेखापरीक्षण झालेले नाही. ‘दौलत’चे उदाहरण समोर असताना गोकुळ संघ मल्टिस्टेट करणे, हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे नेत्यांनी मल्टिस्टेटचा नाद सोडावा. 

मल्टिस्टेट झाले तर त्याचे तोटे काय आहेत?
मुश्रीफ ः मुळात या मल्टिस्टेटला बापच नाही. हे बिन दाव्याचं जनावर आहे. ते मोकाट आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न आहे. मल्टिस्टेटचे शटर एकदा उघडले, की तुम्ही कुठेही जावा. काहीही करा. कोणीही विचारत नाही, अशी परिस्थिती आहे, अशा वेळी दाद कुणाकडे मागणार? असे अनेक प्रश्‍न आहेत. सभासदांचे हक्‍क अबाधित राहणार नाहीत. आता सभा होऊन प्रोसिडिंग लिहिले जाते, मात्र मल्टिस्टेट झाल्यानंतर सभा न घेताच प्रोसेडिंग लिहिले जाईल, अशा वेळी विचारणा कोणाला? असा प्रश्‍न आहे. 

अरुण नरके, पी. एन. पाटील यांचे आश्‍चर्य का वाटते?
मुश्रीफ ः अरुण नरके हे दूध उद्योगातील तज्ज्ञ आहेत. पी. एन. पाटील हेदेखील अनेक वर्षे गोकुळचा कारभार पाहत आहेत. मल्टिस्टेटचा धोका त्यांना माहिती नाही का? सर्व धोके माहीत असतानाही ही मंडळी मल्टिस्टेटला साथ देत आहेत, याचे आपणाला आश्‍चर्य वाटत आहे. मल्टिस्टेटचे फार मोठे दूरगामी परिणाम आहेत. सत्ता हातात ठेवण्यासाठी अघोरी कृत्य असून, त्याला आपण साथ देत आहोत, याचा त्यांनी विचार केला पाहिजे.

साखर कारखाने, दूध संघही मल्टिस्टेट कसे?
मुश्रीफ ः माझा संताजी घोरपडे साखर कारखाना खासगी असून, मल्टिस्टेट आहे. महादेवराव महाडिकांनी बेडकीहाळ येथे खासगी कारखाना काढला आहे. मुळातच हे साखर कारखाने मल्टिस्टेट म्हणून स्थापन करण्यात आले आहेत, मात्र गोकुळ दूध संघ स्थापन करतानाच तो जिल्हा दूध संघ म्हणून स्थापन केला आहे. संघ स्थापनेसाठी शासनाची मदत घेतली आहे. आमच्या बापजाद्यांनी हा संघ उभा केला आहे. दूध उत्पादकांमुळे या संघाचा विस्तार झाला आहे. मग तो आताच मल्टिस्टेट का करता? संघाच्या या भूमिकेला विरोधच राहणार आहे.

अमूलच्या धर्तीवर ‘गोकुळ’ची वाटचाल - पी. एन. पाटील

गोकुळचे मल्टिस्टेट कशासाठी?
 पी. एन. पाटील: गोकुळ हा सुरुवातीस अर्धा करवीर तालुक्‍याचा संघ होता. यानंतर तो जिल्हा संघ झाला. आता तो मल्टिस्टेट करण्यास चाललो आहोत. उत्तरोत्तर संघाची प्रगतीच सुरू आहे. १० लाख लिटरवर प्रक्रिया करणारा हा संघ आता २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे संघाला आता हक्‍काच्या व पुरेशा दुधाची गरज आहे. म्हणूनच मल्टिस्टेट करणे आवश्‍यक आहे. अमूलनेही अशीच सुरुवात केली होती. आज तो देशातच नव्हे विदेशात पोचला आहे. आम्ही जिल्ह्यातील बंद संघांचा विचार करत नसून आमच्या पुढे असणाऱ्या संघाचा आदर्श ठेवून वाटचाल करत आहोत. आम्हाला ‘अमूल’सारखी धाव घ्यायची आहे, असे करणे चुकीचे आहे का?  त्यामुळे मल्टिस्टेटला विरोधाला विरोध करणे बरोबर नाही. 

येलूरचे व्यक्‍तिगत सभासद करण्याचा धोका आहे का?
 पी. एन. पाटील : महाडिकांना संघ ताब्यात हवा असल्याने ते येलूरचे सभासद करतील, असा आरोप होत आहे. मात्र यात काही तथ्य नाही. कारण अशाप्रकारे व्यक्‍तिगत सभासद करण्याची कोणतीही कायद्यात तरतूद नाही. जर त्यातूनही असा प्रयत्न झाला तर माझा त्याला विरोध असेल. आता जे मल्टिस्टेटला विरोध करत आहेत, त्यांच्या पुढे एक पाऊल माझे असेल.  

आमदारकी नको; पण गोकुळ हवे म्हणजे काय?
 पी. एन. पाटील ः अत्यंत चुकीच्या पद्धतीने विचार मांडले जात आहेत. खासदार गायकवाड यांचे आनंदराव पाटील-भेडसगावकर हे कार्यकर्ते होते. या दोघांचा वाद झाला. गायकवाडसाहेब भेडसगावकर यांना पॅनेलमध्ये घेऊ नये, असे सांगत होते. चुयेकर त्यावेळी अध्यक्ष होते. मात्र गायकवाड यांचे चुयेकर व इतरांनी ऐकले नाही आणि भेडसगावकर यांना उमेदवारी दिली. यावरून गायकवाड साहेबांनी घोषणा केली, की पाच वेळा खासदारकी, आमदारकी नको पण गोकुळ हवे. यावरूनच ही चर्चा वाढत गेली. आजही ती सुरू आहे. त्यात काही तथ्य  नाही. 

मल्टिस्टेटला विरोध का होतोय?
 पी. एन. पाटील ः विरोध करणाऱ्या सर्वांना पुढे निवडणुका लढवायच्या आहेत. मल्टिस्टेटचे कारण पुढे करत त्यांची वातावरण निर्मिती सुरू आहे. कारण मल्टिस्टेटला विरोध असता तर ते स्कॉर्पिओवर बोलले नसते. यांचा नेमका मल्टिस्टेटला विरोध आहे की कारभाराला? आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांचेही संचालक आहेत. मुश्रीफ यांनी चर्चा करूनच संचालक दिले आहेत. ते प्रचारालाही एकत्र होते. पाटील हे विरोधात होते. त्यांचे संचालक मात्र आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे विरोध कशासाठी आहे, तेच समजत नाही.

लिटरला १० रुपये जादा दर देणे शक्‍य आहे?
 पी. एन. पाटील : आमदार हसन मुश्रीफ दुधास लिटरला १० रुपये जादा दर देणे शक्‍य असल्याचे सांगत आहेत. दररोज १० लाख लिटर दूध गोळा होते. म्हणजे १० रुपये प्रमाणे दिवसाला १ कोटी व वर्षाला ३६० कोटी रुपये द्यावे लागतील. तसेच दराचे वर्षभरातील चढउतार पाहता किमान ४० कोटी रुपये द्यावे लागले तर वर्षाला ४०० कोटी रुपये द्यावे लागतली. स्कॉर्पिओवर एवढा खर्च होतो का? नया पैसाही खर्च होत नाही. त्यामुळे उगाच टीका आणि विरोध करायची म्हणून दिशाभूल करू नये.

सभा लोकशाही पद्धतीने होणार का?
 पी. एन. पाटील ः सहकारी संस्थेची कोणती सभा शांततेत झाली आहे? सत्ताधारी कधी दंगा करत नाहीत. विरोधकच एखाद्या विषयावर अडून राहतात. त्यामुळे वादावादीचे प्रसंग येतात. नको ते प्रश्‍न विचारल्याने हा वाद वाढतो. उदा. टॅंकरवरून वारंवार दंगा झाला. मग टेंडर काढले. लोकांनी टेंडर भरली. तरीही याच मुद्यावर भांडायचे. त्यामुळेच सभेत दंगा होतो. तरीही सभेवेळी सत्ताधाऱ्यांकडून काही अडचण येणार नाही.

नोकर भरतीत पैसे घेतल्याचा आरोप आहे?
 पी. एन. पाटील ः ‘गोकुळ’मध्ये जी नोकर भरती झाली आहे, त्याची आम्ही यादी देतो. आरोप करणाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मग बोलावे. कोणी १०, २० लाख रुपये घेतल्याचे सांगितले तर त्यांना ५० लाख रुपये देऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com