सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही - पडळकर

सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही -  पडळकर

सांगली - जिल्ह्यात भाजपमध्ये एकही लायकीचा नेता नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच खाडे, नाईक मंत्रिपदाला मुकले, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला घरचा आहेर देत पक्षाला रामराम केला. मात्र पक्ष सोडला का? या प्रश्‍नावर त्यांनी योग्य वेळी बोलू, असे सांगितले. ‘पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची वेळ येते. हे कसले नेते?’ अशा शब्दांत खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. सांगलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यानिमित्ताने श्री. पडळकर यांनी काही महिन्यांपासून पक्षात होत असलेल्या घुसमटीला वाट मोकळी करून दिली.

भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘आमदार सुरेश खाडे आणि आमदार शिवाजीराव नाईक यांचे मंत्रिपद कुणामुळे गेले? त्यांच्या मंत्रिपदाला जिल्ह्यातील नेत्यांनीच विरोध केला. त्यामुळे जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळू शकले नाही. आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील हे तिघे जिल्ह्याचे मंत्री होते. ते सांगलीत बसून राज्यात नाव करत होते. गावगाड्यात बसून जिल्ह्याचे निर्णय घेत होते. मात्र, आज भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दोन दोन दिवस वाट पाहत बाहेर बसावे लागते.’’खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता श्री. पडळकर यांनी टीका केली. 

ते म्हणाले, ‘‘पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची धमकी देण्याची वेळ येते. माझ्या तिकिटाची काळजी कुणी करू नये. मी अनेकवेळा प्रस्थापितांविरोधात लढलोय. यापुढेही लढत राहीन. गेली चार वर्षे मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला पक्षाची गरज नाही. त्यामुळे तिकीट मागण्याचा प्रश्‍नच नाही.’’

त्यांनी त्यांच्या घराची काळजी करावी
श्री. पडळकर म्हणाले, ‘‘पक्षात माझी कसलीही घुसमट होत नाही. मुळात मी जिल्ह्यातील कुणाला माझा नेताच मानत नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये एकही त्या लायकीचा नेता नाही. माझे घर उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपले स्वत:चे घर सांभाळावे. मी खंबीर आहे. आजवर संघर्षच केला आहे. २०१९ च्या रणांगणातही मी उतरणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com