solapur
solapur

हिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला

केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे.

यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने उजनी जलाशय परीसरात देशी-विदेशी पक्षांनी मोठी गर्दी केली आहे. त्यातच आता उजनीचे पाणी झपाट्याने खाली जात असल्याने उजनी फुगवट्याचा भाग व पाणथळ जागा रिकाम्या होत असल्याने आलेल्या पाहुणे पक्ष्यांना विनासायास भरपूर खाद्य मिळत आहे त्यामुळे वरचेवर पक्ष्यांची संख्या वाढता वाढता वाढतच आहे.
     
प्रणयक्रीडेत नैपुण्यता दाखवण्यात तरबेज अशी ओळख असलेल्या हिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदकांच्या अनेक जोड्या सध्या उजनीवर विहाराला आले आहेत. 

भगवा किंवा बदामी रंगाचा सोनेरी पिसारा, केतकी रंगाचे डोके आणि मान व काळी शेपटी अशा रंगसंगतीने सुंदर दिसणारे हे स्थलांतरित पाहुण्या बदकांनी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गर्दी केली आहे. इंग्रजीत रुडी शेल्डक (Rudy Shelduck) किंवा ब्राह्मणी डक (Brahmany duck) असे नाव असलेल्या या स्थलांतरित बदकांना मराठीत चक्रवाक, ब्राह्मणी बदक, चकवा, चकवी, सोनेरी बदक इत्यादी नावाने ओळखतात. आकाराने मोठ्या बदकाएवढ्या असलेल्या या बदकांना निसर्गाने मनमोहक रंग बहाल केल्यामुळे ही बदके रुबाबदार वाटतात.
 
जोडीजोडीने ही बदके तुलनेने यंदा उजनीवर येऊन पाणवनस्पतीची कोवळी पाने, कोंब, खोड व गोगलगायी, शिंपल्यातील मृदुकाय प्राणी खाण्यात व्यस्त आहेत. जलकीटक, मासे, बेडकांची पिल्ले यासह चिखलातील कृमी, कीटक सुद्धा ह्या बदकांचे प्रमुख खाद्य आहे. दरवर्षी ही बदके एप्रिल ते जून दरम्यान वीण घालण्यासाठी हिमालय व आसपासच्या नेपाळ, तिबेट व लडाख परिसरातील सरोवरात एकवटतात. हिवाळ्यात ही बदके आपल्या पिल्लावळांसह भारत भ्रमंतीला येतात व देशभर  विखरले जातात. 

प्रियाराधनेत तरबेज पक्षी म्हणून या बदकांकडे पाहिले जाते. अनेकवेळा या पक्ष्यांचा उल्लेख साहित्यातून केला गेला आहे. या बदकांमध्ये एकदा जमलेली जोडी जीवनभर एकनिष्ठेने संगत निभावतात. जोडीतील एखाद्याचा मृत्यू झाला तर दुसरा पण विरह वेदनेने मृत्यू पत्करतो अशी अख्यायिका आहे. या प्रणयी पक्ष्यांचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही केला गेला आहे. चीन व मंगोलिया या देशात चक्रवाकांना आदराचे भावना आहे. 

उजनीच्या निर्मितीनंतर शेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आले तसेच खऱ्या अर्थाने उजनीत असलेल्या देशी-विदेशी विविध जातीचे पक्षी डोळ्यांना सुखद दिलासा देणार्‍या या पक्षांनी उजनीचे नाव देश-परदेशात नेऊन ठेवले त्यातही उजनी वर येणाऱ्या अग्निपंख(फ्लेमिंगो) अर्थात रोहित पक्षी सर्वांची आकर्षणाचे केंद्र ठरले.

नेहमी येणाऱ्या फ्लेमिंगो बरोबरच यावर्षी अनेक देशी-विदेशी पक्षांनी आपला मोर्चा उजनीकडे वळविला आहे. यामध्ये मच्छी घार तर आता चक्रवाक बदक ही उजनी वर दाखल झाले आहे.

वरचेवर उजनीच्या प्रदूषणात होत असलेली वाढ तशीच महसूल विभागाच्या वरदहस्ताने रात्रीच्या वेळी जलाशयातून होत असलेली वाळू चोरी पक्ष्यांच्या अधिवासास धक्का पोहोचवत आहे याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही.

वाढत्या प्रदूषणामुळे मानवासह पशुपक्षी प्राणी व पर्यावरणाची साखळीच कोलमडण्याची शक्यता आहे व भविष्यात अशी सुंदर दृश्य पहावयास मिळावे असे वाटत असेल तर जागरुक नागरिक, पक्षीप्रेमी, पक्षीअभ्यासक यांनी धरणात पाणी प्रदूषण व अवैद्य वाळू उपसा आवाज उठवून आंदोलन केले पाहिजे उजनी धरणातील पाण्यासह जैवसंपदा, पक्षीसौंदर्य, कायम टिकून ठेवण्यासाठी ठोस पावले उचलून खऱ्या अर्थाने उपाययोजना करण्याची व शासनाने याकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.

"चक्रवाक बदके दरवर्षी उजनीवर न चुकता येतात. मात्र तुलनेने इतर स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे यावर्षी ही बदके लक्षणीय संख्येने आले आहेत. त्यामुळे उजनी परिसर या मोहक बदकांच्या वावराने फुलून गेला आहे."  
- प्रा. डॉ. अरविंद कुंभार पक्षी अभ्यासक, अकलूज

"उजनी जलाशयावर यावर्षी देशी/विदेशी पक्षी बहुसंख्येने आल्याने पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच ठरत आहे."
- प्रा. कल्याणराव साळुखे, कुंभेज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com