कऱ्हाड पालिका होणार वीजनिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण

Vijay-Vategavkar
Vijay-Vategavkar

कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी प्रकल्प, नवीन जलशुद्धीकरण केंद्रासह विविध शॉपिंग सेंटर सौर ऊर्जेवर चालवणार आहे. 

शहरात पथदिवे बदलून एलईडी दिवे लावण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यातच राज्य शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरणकडून दहा किलो वॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प शंभर टक्के अनुदानातून पालिकेस भेट देण्यात आलेला आहे. पालिकेच्या जुन्या इमारतीवर सौर ऊर्जेची संयत्रे बसवण्याचे काम सुरू झाले आहे. प्रकल्पामुळे पालिकेस लागणाऱ्या संपूर्ण विजेची बचत होणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात आता पालिकेचा कारभार चालणार आहे. ती आश्वासक स्थिती लक्षात घेऊन पालिकेच्या नियोजन विभागाने शहरातील सर्व यंत्रणा सौर ऊर्जेवर बसविण्यासाठी प्रकल्प तयार केलेला आहे.

त्या प्रकल्पांतर्गत शहरातील सर्व यंत्रणा आता सौर ऊर्जेवर चालणार आहेत.
 शासकीय, निमशासकीय कार्यालयांत वीज वापर कमी करण्यासाठी शासनाने २०१३ मध्ये अपारंपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचारासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका, पालिकांसह शासकीय, निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. त्या ऊर्जा विकास अभिकरणाचा लाभ घेण्यासाठी पालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आहे. 

शहरात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. 
त्याद्वारे पालिका सुमारे २००० किलोवॉटची ऊर्जानिर्मिती करणार आहे. ती वीज मंडळास विकली जाणार आहे. त्यामुळे पालिकेस वीज बिलात मोठी बचत होणार आहे. सध्या पालिकेस प्रत्येक महिन्यास किमान ३० लाख तर वर्षाकाठी सुमारे चार कोटींच्या आसपास वीज बिलांवर खर्च करावा लागतो आहे. 

या व्यवहारानुसार पुढील २५ वर्षांत किमान नव्वद कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो वाचविण्यासाठी पालिकेला केवळ एकाच वेळी सुमारे १४ कोटींचा खर्च करून प्रकल्प उभा करावा लागणार आहे. तो प्रकल्प शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या इमारतींवर उभारण्यात येणार आहे.

त्यानुसार प्रत्येक भाग कव्हर केला जाणार आहे. त्या सौर ऊर्जेवर शहरातील सर्व पथदिवे, सांडपाणी प्रकल्प, नवीन जलशुद्धीकरण केंद्रासह विविध शॉपिंग सेंटर, स्टेडियमसह विविध भाग चालणार आहेत. शहरातील किमान १३ पेक्षाही जास्त वेगवेगळ्या इमारतींवर तो प्रकल्प वेगवेगळ्या क्षमतेनुसार बसविला जाणार आहे. सध्या पालिकेच्या इमारतीवर दहा किलो वॉटचा प्रकल्प शासकीय शंभर टक्के अनुदानातून उभा राहतो आहे. येत्या सहा ते सात महिन्यांत पालिका सौर ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे.

वीजबिलाच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी पालिका सौर ऊर्जा प्रकल्प उभा करत आहे. त्याची तांत्रिक मान्यता लवकरच अपेक्षित आहे. शहरातील काही इमारतीही फिक्‍स केल्या आहेत. त्या प्रत्येक इमारतीवर वेगवेगळ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्यातून पालिकेची पुढील १५ वर्षांत किमान ७० ते ८० कोटींची बचत होणार आहे.
- विजय वाटेगावकर, सभापती, नियोजन समिती, कऱ्हाड

...येथे बसणार सौर ऊर्जा प्रकल्प 
  नवीन जलशुद्धीकरण केंद्र
  सांडपाणी प्रकल्प 
  सुपर मार्केट 
  यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन
  पालिकेचा बहुद्देशीय हॉल
  पालिकेच्या वेगवेगळ्या शाळांच्या इमारती 
  स्टेडियम इमारत 
  स्मशानभूमी परिसर
  कृष्णा घाट 
  शिवाजी भाजी मंडईची इमारत
  संभाजी भाजी मंडईची इमारत  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com