केरळमध्ये वसणार ‘कोल्हापूरनगर’

केरळमध्ये वसणार ‘कोल्हापूरनगर’

कोल्हापूर -  अतिवृष्टीने वाताहत झालेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात कोल्हापूरकरांतर्फे २०० घरकुले उभी राहणार आहेत. ‘कोल्हापूरनगर’ अशीच त्याची ओळख असेल. खासदार धनंजय महाडिक, कणेरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या नियोजनातील २०० घरांपैकी १०० घरे बांधून देण्यासाठी देणगीदारही नक्की झाले आहेत.

अवघ्या एक लाखात ४५० चौरस फुटांचे एक घर उभे राहील, असे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. शिवाय प्रत्येक घरात दूध-दुभत्यासाठी कणेरी मठातर्फे एक देशी गाय भेट देण्यात येणार आहे. गायीच्या शेणावर घरात गोबर गॅस सुरू राहावा, यासाठी प्रत्येक घराला गोबर गॅस यंत्रणाही दिली जाईल. 

या उपक्रमासंदर्भात खासदार धनंजय महाडिक ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले, त्यासाठी देशभरातून जरूर असंख्य मदतीचे हाक पुढे येत आहेत. पण आम्ही असे ठरविले की अतिवृष्टीमुळे सर्वस्व वाहून गेलेल्या लोकांना निवाऱ्याची आवश्‍यकता असते. हा निवाराच आपण बांधून दिला तर तो कायम स्वरूपाचा होईल. त्यामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्याचे खासदार पी. के. टीचर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की या जिल्ह्यात अतिशय गरीब कुटुंबांची कच्च्या घरांची वस्तीच्या वस्ती वाहून गेली आहे. त्यामुळे ही वस्ती पुन्हा उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही २०० घरांची ही वस्तीच पुन्हा उभी करून देण्याचा विचार केला. कोल्हापुरातील विविध व्यक्ती, संस्था, संघटनांशी मी चर्चा केली. कणेरी मठाचे श्री अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराजांनीही यात लक्ष घातले. ते २०० घरांत प्रत्येकी एक गाय मोफत देणार आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘आता प्रत्येकी एक लाख किंवा त्याहून अधिक रक्कम देऊन घरे बांधून देण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. मी ५ घरांच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. गणेशोत्सवातील खर्च कमी करून मंडळेही पुढे आली तर २०० घरांच्या बांधकामाचे आव्हान पूर्ण करू.’’

घरांसाठी सरकारी जागा केरळ सरकार देणार आहे. २०० घरांची ही घरकुले कोल्हापूरनगर नावाने वसवली जाणार आहेत. शिवाय, जो घरासाठी एक लाख रुपये देईल, त्याचे नाव घरास देण्यात येणार आहे.
- धनंजय महाडिक
, खासदार

केवळ आपत्तीग्रस्त लोकांना घर बांधून देऊन चालणार नाही. त्यांना गायी देण्यात येणार आहेत. शिवाय, सेंद्रिय शेतीचे ज्ञानही देणार आहे. कारण, वायनाड जिल्हा कर्करोगग्रस्त म्हणून अधिकृत जाहीर आहे. तेथे ड्रोनने रसायनांची फवारणी होत असे. आता हेही चित्र बदलण्यासाठी प्रयत्न असतील.
- अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com