तात्या... एक खळाळ!

Laxmanrao-Patil
Laxmanrao-Patil

आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याविषयी विलक्षण जिव्हाळा आणि बाका प्रसंगात निडरपणे पुढे धावणारे लौकिकार्थाने नेते; पण स्वत:ला ‘अखंड कार्यकर्ता’ समजणारे लक्ष्मणराव पाटील ऊर्फ तात्या... जिल्ह्याच्या पाच-सहा दशकांच्या राजकारणावर त्यांनी उमटलेली नाममुद्रा काळाला कधीच पुसता येणार नाही...

स्थानिक स्वराज्य संस्था या नेतृत्व घडवणाऱ्या पाठशाळा ठरल्या आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधताना उद्याच्या महाराष्ट्राचा कारभार पाहणारे लोकप्रतिनिधी हे केवळ राजकीयच नव्हे, तर गुणात्मक पातळीवरही सकस असावेत, याचा द्रष्टेपणाने विचार करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ पुरवले आणि ज्या कार्यकर्त्यांत नेतृत्वाचा ‘स्पार्क’ दिसला त्यांना या संस्थांत काम करण्याची संधी दिली. या कामी सातारा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते किसन वीर यांची त्यांना असे कार्यकर्ते निवडण्यात मोठेच सहकार्य लाभले. पुढील काळात यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आणि व्यस्त राहिल्यानंतर किसन वीर यांच्याकडेच जिल्ह्याच्या कारभाराची सूत्रे आणि निर्णयाचे अधिकारही आले. या स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रत्येक पायरीला स्पर्श करत पुढे आलेले नेतृत्व म्हणजे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील. पुढील काळात म्हणजे सत्तरच्या दशकापासून ते आजपर्यंत जवळपास पाच-साडेपाच दशकं सातारा जिल्ह्याचे विशेषत: वाई तालुक्‍यातील राजकारण त्यांच्याभोवती फिरत राहिल्याचे दिसते.

लक्ष्मणराव पांडुरंग जाधव-पाटील ऊर्फ तात्या यांचे गाव वाई तालुक्‍यातील बोपेगाव. पुणे-बंगळूर महामार्गानजीकची कवठे, केंजळ, बोपेगाव, ओझर्डे, भुईंज, बावधन, खंडाळा, पारगाव ही अत्यंत सजग आणि तालुक्‍याच्या राजकारणावर आपली छाप उमटवणारी गावे. तात्या तसे राजकारणात ठरवून आले, अशातला भाग नाही. ते आले तसे अपघातानेच. शिकून पुढे नोकरीत रममाण होऊ इच्छिणाऱ्या तात्यांना राजकारणाने आपल्याकडे ओढले. वडील बंधू रामराव जाधव-पाटील हे तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते. आमदार दादासाहेब जगताप यांच्याबरोबर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा मोठा जम वाई तालुक्‍यात बसवला होता; परंतु त्यांचे अकाली निधन झाले आणि त्यांच्या विधायक कामाचा वारसा चालवण्यासाठी तात्या बोपेगावला परतले. शिक्षण-नोकरी सोडून सार्वजनिक जीवनात प्रवेश करताना त्यांनी थेट पुस्तक वाचायला सुरवात केली नाही.

राजकारणाची अंकलिपी आणि राजकारणाचे व्याकरण बारकाईने शिकत बोपेगावचे सरपंच झाले. यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांनी बेरजेच्या राजकारणाची संकल्पना महाराष्ट्रात यशस्वी करण्याचा प्रयत्न चालवला होता. तात्यांनी काँग्रेस पक्षाचा, चव्हाणसाहेब आणि आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाचा जाणीवपूर्वक स्वीकार केला. त्यांच्या राजकारणाची सुरवात अशी पुरेशा परिपक्व आणि गंभीर जाणीवेतून झालेली आपणास दिसते.

प्रभावी व्यक्तिमत्त्व, कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणारे वक्तृत्व, पक्षाच्या विचारधारेचा जाणीवपूर्वक स्वीकार केल्यामुळे कुठलाही वैचारिक गोंधळ मनात नाही. जोडीला पाटील घराण्यातून आल्यामुळे थोडासा स्पष्टवक्तेपणा, महत्त्वाकांक्षा आणि गरज पडली तर अन्यायाविरुद्ध दोन हात करण्याची तयारी... प्रसंगी स्वाभिमान जागवताना बंडखोरी तर अति झाल्यास कुणालाही अंगावर घेण्याची आणि कुणाच्याही अंगावर जाण्याची तयारी... थोडक्‍यात काय तर जे करायचे ते गुलाल-बुक्‍यासारखं उधळून करायचं... ही सारी त्यांची व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये..! आपल्या पन्नास-साठ वर्षांच्या राजकीय आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी यशवंतराव चव्हाण-आबासाहेब वीर, प्रतापराव भोसले यांचे नेतृत्व मानले. उत्तरार्धात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे केवळ नेतृत्वच नव्हे, तर त्यांनाच सर्वस्व अर्पण करून त्यांनी बाणेदारपणे राजकारण केले.

गावचे सरपंच, पुढे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, वाई पंचायत समितीचे सभापती, सातारा जिल्हा परिषदेचे सलग अकरा वर्षे अध्यक्ष, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे सलग दहा वर्षे अध्यक्ष, सातारा जिल्हा बॅंकेचे दीर्घकाळ संचालक, पुढे अध्यक्ष, सातारा मतदारसंघाचे लोकसभेत सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व, जनता शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त, दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष संघटनेचे तालुका, जिल्हा पातळीवर नेतृत्व करीत कुशल संघटक म्हणून पक्षात लौकिक संपादन करणारे ते जिल्ह्यातील एकमेव नेते ठरले. कुठलीही संस्था, चळवळ, संघटना, व्यक्ती जेव्हा नावारूपाला येते, तेव्हा तिच्या अधिकच्या चांगल्या गुणांचा विचार झालेला असतो. तात्यांचा उल्लेख ‘ज्येष्ठ नेते’ असा होतो. ज्येष्ठ नेते म्हणून कर्तबगारीने ते या अभिधानाला निश्‍चितच पात्र ठरले, पण ते स्वत:ला कार्यकर्ताच समजत राहिले. मला स्वत:ला तर त्यांच्यात अखेरपर्यंत एक अखंड कार्यकर्ताच दिसला.

तात्यांच्या एकूण राजकारणाची चिकित्सा करायचीच ठरवली, तर दोन-तीन ठळक मुद्दे येतात. ज्या विचारधारेला प्रमाण मानून आणि ज्या नेतृत्वाने आपल्याला या विचार प्रवाहात आणले, त्या नेतृत्वाची अत्यंत हिरीरीने पाठराखण त्यांनी केली. यशवंतराव आणि किसन वीर हे त्यांचे सुरवातीचे नेते. किसन वीर यांनी या कार्यकर्त्याच्या धडाडीला-नेतृत्वगुणाला योग्य ते कोंदण देण्यासाठी एक मोठा प्रयत्न केला होता. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत किसन वीर यांना लक्ष्मणराव पाटील विधानसभेसाठी उमेदवार म्हणून हवे होते; परंतु यशवंतराव चव्हाण यांनी प्रतापराव भोसले यांच्या पारड्यात वजन टाकले. पक्षात एकदा निर्णय झाला, की तो सर्वांनी मनापासून पाळायचा-यशस्वीही करायचा, ही त्यावेळची राजकीय संस्कृती होती. 

आबांनीही हा निर्णय स्वीकारला. पण, या एका निर्णयामुळे तात्यांची विधानसभेची बस चुकली ती चुकलीच. तो राजकीय इतिहास वेगळाच आहे. पुढील काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम जिल्हा परिषदेला देशाच्या पटलावर घेऊन गेले. पण, नव्या-जुन्यांशी संबंध राखणारा, शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात तडफेने राबवणारा असा अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसरा दिसत नाही. (चिमणराव कदम याला अपवाद असले, तरी त्यांना अध्यक्ष म्हणून अगदीच थोडा कालावधी मिळाला.) जिल्ह्यात काम करणारे तात्या तालुक्‍यात सर्जेराव जाधव, शंकरराव गाढवे, नारायणराव पवार, विठ्ठलराव गायकवाड, राजाभाऊ जाधव, बकाजीराव पाटील, नारायणराव हगीर, सखारामबुवा वाडकर, प्रताप पवार आदी दमदार सहकाऱ्यांबरोबर वाई-खंडाळा तालुक्‍यात काम करीत होते. आपले संघटनात्मक काम, तडफ, महत्त्वाकांक्षा यातून तात्या विधासभेसाठी उत्सुक आणि इच्छुकही होते. पण, तेव्हा पक्षाचा निर्णय महत्त्वाचा होता.

प्रतापराव भोसले यांना ते नेते मानत होते, असे असले तरी आपल्या वर्तमानाच्या आणि भविष्यातील राजकारणाची सुरक्षितता प्रत्येकाला महत्त्वाची वाटते. अखेर ते ‘राजकारण’ आहे. प्रतापराव भोसले यांच्याकडून त्यावेळच्या मुख्य राजकीय प्रवाहातून खूपच बाजूला असलेल्या मदनराव पिसाळ यांना संधी मिळाली. तेथेही तात्यांची संधी हुकली. आपली पात्रता असतानाही नेतृत्वाकडून डावलेले गेलेल्या तात्यांचा तो प्रचंड अस्वस्थतेचा काळ होता. त्यांनी अखेर नेतृत्वाला झुगारून दिले आणि बंडखोरीची भाषा प्रथमत: उच्चारली. त्यांना कडवा विरोध झाला. हे बंड अयशस्वी झाले. पण, या अयशस्वी बंडात पुढच्या त्यांच्या यशस्वी राजकारणाची बिजे पेरली गेली आणि पुढे ती ही बिजे दमदारपणे उगवल्याचे आपण पाहिले. 

काँग्रेस पक्षांतर्गत मोठे स्थित्यंतर झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी’ ची स्थापना झाली. आपल्या जवळचा नेता आपल्या गुणांची पारख करण्यात चुकला; किंबहुना या नेतृत्वाकडून तसे करण्यात काही व्यक्तिगत राजकीय अपरिहार्यता असेलही. तात्यांनी या नेतृत्वाला सोडचिठ्ठी देत समान विचारधारा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळ केले. शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर मोठा विश्‍वास टाकत त्यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले. तात्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ठरले. तत्कालीन विधानसभेच्या दहापैकी नऊ जागांवर घवघवीत यश मिळवले. मदनराव पिसाळ यांनाही बरोबर ठेवत ‘बेरीज’ साधली. स्वत: लोकसभेत सलग दोनदा प्रतिनिधित्व केले. हे करीत असताना त्यांनी जिल्ह्यात पक्ष नेतृत्वाचा एक मानदंड प्रस्थापित केला.

सार्वजनिक जीवनात आपल्या प्रतिमेची काही वेळा अवास्तव काळजी घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो. तात्या त्याला अपवाद ठरले. शरद पवार असोत, अध्यात्मातले बाबामहाराज सातारकर असोत, मंत्रालयातील मोठा सनदी अधिकारी असो, की वाडीवस्तीवरील छोटा-मोठा कार्यकर्ता असो, त्यांचा सर्वांशी संवाद बेधडक असे. त्यांच्याकडे असणाऱ्या प्रचंड आत्मविश्वासाचा तो परिणाम होता. आजवरच्या सर्व पायऱ्यांना स्पर्श करीत वर येतानाचा अनुभव होता. लौकिकार्थाने ते फार शिकलेले अथवा उत्तम वाचक नव्हते; पण अनेक विचारवंत, नेत्यांचे विचार ऐकून, त्यांचे वैचारिक परिपोषण झाले होते. (त्या काळातील पक्षाच्या शिबिरातील विचारमंथनाचा हा लाभ म्हणायचा.) तोच विचार त्यांच्यात झिरपला होता. त्यामुळे चांगले-वाईट यातील अंतर समजण्याचा त्यांचा ‘वकुब’ मोठा होता.

आपल्या नेतृत्वाविषयी त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही विशेष ठरली. स्वातंत्र्य चळवळीत ठळक कामगिरी बजावल्यानंतर किसन वीर यांनी स्वातंत्र्योत्तर काळात वाई तालुक्‍यात-जिल्ह्यात मोठे विधायक रचनात्मक संस्थात्मक काम केले. त्या कामात तात्या सहभागी होतेच. आपल्या नेत्याने उभ्या केलेल्या कामाचे स्मरण नवीन पिढीला राहावे म्हणून सातारा सहकारी साखर कारखान्याचे ‘किसन वीर’ असे नामकरण करणे, कारखाना परिसर आणि कवठे येथे त्यांचे स्मारक उभे करणे, सातारा येथे पोवई नाक्‍यावर किसन वीर यांचा पुतळा उभा करणे असो, यातून आपल्या नेतृत्वाविषयीची कृतज्ञता किती उच्च कोटीची होती, ते दिसून येते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी पोवई नाक्‍यावर यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असताना यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा नवीन बॅंकेच्या कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात पुढाकार घेतला. प्रतापराव भोसले आणि त्यांच्यात पुढील काळात अंतराय निर्माण झाला, तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपले मतभेद ताणले जाणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. त्याला व्यक्तीद्वेषाचा रंग येणार नाही, याची काळजी घेतली. नेतृत्वाविषयीच्या प्रेमातून त्यांनी भाऊंच्या एकसष्ठीचा मोठा समारंभ घडवून आणला होता. एकूण काय तर विलक्षण कडवेपणा आणि विलक्षण जिव्हाळा ही तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली.

नवीन पिढीशी त्यांची मैत्री ही सदोदित कोडे वाटणारी बाब. आपल्या मुलांबरोबर संवाद नसेल, एवढा आपल्या मुलांच्या वयाएवढ्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचा विलक्षण संवाद असायचा, असा संवाद साधण्यात अनेकांच्या बाबतीत ‘जनरेशन गॅप’ आडवी येते. तात्यांना अशी ‘गॅप’ कधी आडवी आली नाही. त्यामुळेच त्यांच्या २८ फेब्रुवारीला वाढदिवशी जिल्हाभरातून अनेक कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी विकासनगरला जमत असे. हारांचे-पुष्पगुच्छांचे मोठ-मोठे ढीग ही तात्यांची ‘श्रीमंती’ ठरली. अशी श्रीमंती माझ्या माहितीमध्ये जिल्ह्यात तात्यांच्याच वाट्याला अधिकांशाने आली. त्यांना कुणाचाच जुलमाचा रामराम मिळाला नाही आणि तसे करणारांना त्यांनी आपल्या एरवीच्या स्पष्ट (इतरांच्या दृष्टीने फटकळ) बोलण्यातून नेहमीच दूर ठेवले.

तात्यांनी सर्वस्तरावर काम करीत आपली छाप उमटवली. शिक्षणाच्या-भाषेच्या मर्यादा असल्या तरी लोकसभेत प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्यापरीने प्रभावी काम केले. आपल्या राजकीय कारकिर्दीत हजारो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांबरोबर त्यांना घरचीही मोठी साथ लाभली. तात्यांचे घर म्हणजे अवघ्या जिल्ह्याचे घर ठरले. कार्यकर्त्यांसाठी घराचे दरवाजे २४ तास उघडे ठेवणारा आणि कुठल्याही वेळेला आलेला कार्यकर्ता किमान चहा घेतल्याशिवाय आणि आपल्या कामाची सोडवणूक झाल्याशिवाय त्यांच्या घरातून कधीच परत गेला नाही. हा व्याप सांभाळणं एवढं सोप्प नसतं.

तात्यांचे तिनही पुत्र, पत्नी काकी आणि अवघा परिवार हा राजकारणालाच वाहिला गेला आहे. तात्यांच्या विधायक कार्याचा, संसदीय राजकारणाचा वारसा मकरंद चालवत आहेत. ते सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. नितीन जिल्हा बॅंकेत संचालक आहेत. थोरले पुत्र मिलिंद, पुतणे अविनाश हे सारे त्‍यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. पत्नी सुमनताई या साऱ्याच कार्यकर्त्यांच्या काकी झाल्या. तात्यांच्या जीवनात त्यांचे स्थान गृहिणी, सचिव असले तरी अखेरच्या आजारपणाच्या टप्प्यात त्या त्यांच्या आईच झाल्या होत्या. 

तात्यांच्या आयुष्याचा आठ दशकांचा आणि सुमारे पाच-सहा दशकांचा राजकीय प्रवास आता थांबला आहे. केवळ वाई-खंडाळा नव्हे, तर अवघ्या सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात विशेषत: राजकारण आणि सहकार क्षेत्रावर त्यांनी उमटवलेली नाममुद्रा दीर्घकाळ अंमलात राहील. यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या राजकीय विचारांशी नवीन पिढीला जोडणारी एक मोठी साखळी होती. त्यातील एक महत्त्वाची कडी आज तात्यांच्या रूपाने निखळली. एक-दोन कड्या शिल्लक आहेत. पण, तात्यांइतका त्यांचा संवाद नवीन पिढीशी उरला नाही, त्यामुळे ही साखळीच तुटली, असे दु:खद मनाने म्हणावे लागते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com