LokSabha 2019 : हुश्‍श...चला एकदाचा सामना सुरू झाला

LokSabha 2019 : हुश्‍श...चला एकदाचा सामना सुरू झाला

सांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी महिनाभरापूर्वी कुणी सांगितलं असतं तर त्याला कृपामयीचा रस्ता दाखविला गेला असता. पण, राजकारणात अनपेक्षित काही नसतं. वसंतदादांच्या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली सांगली गलगले-बिरजेंच्या भाजपची कधी झाली, हे कळलं नाही. तसंच हे आहे. असो. आता सामना रंगतदार असेल हे नक्की. शेट्टींनी दादा-बापू अशा दोन्ही टोकांचा मिलाफ साधायचा प्रयत्न केला आहे. हे ट्युनिंग कडेला नेले तर शेट्टींना देशाच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष करायला कुणाचीच हरकत नसेल. हुश्‍श... sss चला....एकदाचा सामना सुरू झाला.

गेल्या महिन्याभरात सांगलीत भाजपच्या विरोधात कुस्ती करायलाच मी नाही तू लढ असे म्हणत नकार घंटा सुरू होती. आता अर्ज भरण्याची वेळ संपत आली तसे तिरंगी-चौरंगी सामन्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वाभिमानीला सांगली नव्हे तर तुपकरांसाठी बुलढाणा  हवे होते. पक्ष म्हणून मान्यतेसाठी दोन खासदार हवेत, मताच्या टक्‍केवारी वाढायला हवी, ही त्यांच्यासमोरची आव्हाने आहेत. भाजप-शिवसेनेला घटस्फोट देऊन शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि भल्याभल्यांना न मिळालेली सांगली अगदी अलगदपणे शेट्टींच्या झोळीत पडली. 

उमेदवारही सांगलीचे भाग्यविधाते असलेल्या वसंतदादांचे नातू विशाल पाटील मिळाले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा पत्ता कट झाला. पडळकरांनीच भाजपमध्ये बंड केले ते  भाजपमधले असंतोषाचे जनक ठरले, त्यामुळे शेट्टी त्यांनाच स्वाभिमानीचा लंगोट चढवून बार उडवतील असे अनेकांना वाटले; पण त्यांच्या बंडापेक्षा शेट्टींना वसंतदादांच्या घराण्याचा पासंग त्यांच्या राजकारणासाठी महत्त्वाचा वाटला. प्रतीक यांच्याशी असलेला जुना पैरा फेडायची संधी मिळाली.

जयंत पाटलांशी त्यांचा हातकणंगल्यात दोस्ताना असला तरी सांगली आणि इस्लामपूर या दोन्हीचा त्यांनी बॅलन्स केला आहे. खरे तर शेट्टींना ही जागा काँग्रेस सोडेल अशी कोणतीच परिस्थिती सांगलीत नव्हती. त्यांनी स्वतःचा उमेदवार दिलाच असता तर बूथसाठी कार्यकर्ते जमविण्यापासून सुरवात करावी लागली असती. 

मधल्या काळात स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी इंद्रजित देशमुखांपासून आर. आर. यांच्या कन्या स्मिता यांच्यापर्यंत अनेक नावे चर्चेत आली. देशमुखांनी नकार दिल्यावर शेट्टींपुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील देखील पॅड बांधून बॅंटिंगला तयारही होते; मात्र त्यांना पॅड काढून ठेवायला लागले. त्यांना दिली तर शेट्टींना जयंतरावांच्या आहारी गेल्याचा आळ येईल असे वाटले असावे. मग शेट्टींनी कोंगनोळीचे सरकार अजितराव घोरपडेंना चाचपून बघितले. पण सरकारांना पुन्हा भाजपच्या तंबूतच ठेवण्यात पृथ्वीराज देशमुखांनी आपली भूमिका पार पाडली.

मुख्यमंत्र्यांनी घोरपडे शेट्टींची बॅट उचलणार नाहीत याची काळजी घेतली. पण दादा घराण्यावर अन्याय होतोय असा सूर जसा उमटू लागला तसे शेट्टी अस्वस्थ झाले त्यांनी ही जागा नको मला शिर्डी किंवा अकोला द्या म्हणून आघाडीकडे निरोप धाडला होता. या साऱ्या चर्चेत काँग्रेसचे नेते मात्र सांगलीबद्दल कसलीच खंत दाखवत नव्हते.

पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडात म्हणाले,‘‘छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला.’’ शेवटी सांगली  काँग्रेसमध्ये झोंबडे मिटवायला शेट्टींनाच पुढे यावे  लागले. त्यांनी विशाल यांनाच स्वाभिमानीची ऑफर  दिली. लढताय का बघा नाहीत तर दुसरा पैलवान उतरवतो असे सांगून टाकले. त्यानंतर विशाल यांच्या हालचाली 
गतिमान झाल्या. सांगलीच्या राजकारणाचा संपूर्ण पटच गेल्या पाच वर्षांत झपाट्याने बदलला आहे. 

२०१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेली सांगलीची काँग्रेस पाच वर्षांनंतर आपली जागासुद्धा टिकवू शकली नाही, ही गोष्ट पक्षाला एखाद्या जखमेसारखी सलत राहणारी आहे. तशीच अवस्था राष्ट्रवादीचीही झाली आहे. राज्याला नेतृत्व देणाऱ्या जयंतराव-आर.आर यांना त्यांना दोन जागा टिकवण्यापलीकडे जिल्ह्यात आज स्थानच उरलेले नाही. 

राज्यात आघाडी करणाऱ्या जयंतरावांना काँग्रेससोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करूनही सूर सापडत नाही अशी स्थिती आहे. पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील असे अनुभवी फलंदाज नसल्याने रणनीतीचा पूर्ण अभाव जाणवला. विशाल पाटील यांना मैदानात उतरविण्याचा धाडसी निर्णय राजू शेट्टी यांनी घेतला आहे. तो धाडसी एवढ्यासाठी की, जयंत पाटलांसह काँग्रेसमधील अनेकांना विशाल यांची उमेदवारी  अनपेक्षित आहे. यावरून विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांची एकमेकांवरील टीका तसेच काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांचे रेसमध्ये आलेले नाव...या साऱ्या घडामोडी आता शिळ्या झाल्या आहेत. 

विशाल पाटील आयुष्यात एवढ्या मोठ्या निवडणुकीला प्रथमच सामोरे जात आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा  बॅंकेच्या निवडणुकीत आपल्या राजकीय चाणाक्षपणाची साक्ष दिलेली आहे. पण त्यांच्यासमोर स्वकीयांची नाराजी दूर करण्याबरोबरच भाजपचे तगडे आव्हान आहे. सुमारे अडीच लाख मतांचे संजय पाटील यांचे गेल्यावेळचे लिड आहे. त्यानंतर बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजप अंतर्गत असलेली धुसफूस गटबाजी याचा  ते फायदा कसा घेतात, शेट्टींच्या मागे असलेला शेतकरी वर्ग त्यांना साथ कशी देतो यावरच या लढतीचे चित्र राहणार आहे. त्यात गोपीचंदांची बंडखोरी थांबविली जाईल की लढत तिरंगी होईल यावरही निकाल अवलंबून असणार आहे.

भक्कम भासणाऱ्या भाजपच्या गढीला खिंडार पाडण्यासाठी विशाल आणि गोपीचंद यांना वेगवेगळी आयुधे वापरावी लागतील. ती वापरण्यासाठीचे हातही निवडावे लागतील. त्यावर या निवडणुकीचा रागरंग ठरणार आहे. उमेदवारी मिळवण्यात इतका क्‍लायमॅक्‍स रंगला आता मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेऊन रंगतदार शेवट करायची जबाबदारी दोन युवा विशाल आणि गोपीचंद (ते वर्षाच्या आदेशाला भीड घालणार नाहीत असे गृहीत धरून) या दोन नवख्या फलंदाजावर असेल.

मल्टीस्टार-कास्ट स्क्रिप्ट 
भाजपसाठी एकतर्फी वाटणारे मैदान आता रंगतदार होण्याच्या दिशेने निघाले आहे. विशाल-संजयकाका या मुख्य कलावंताच्या बरोबरीने बंडखोर गोपीचंद बंड  आहे, पाहुणे कलाकार प्रकाश शेंडगे अशा मात्तबर कलावंताची सांगलीच पटावर ऐंट्री झाली आहे. एखाद्या मल्टीस्टार कास्ट चित्रपटात शोभावेत असे हे सारे हिरो आहेत, याशिवाय काही उघड आणि छुपे खलनायक सर्वत्र आहेत. ॲक्‍शन, इमोशन, सस्पेन्स, आरोप-प्रत्यारोपांची कॉमेडी चित्रविचित्र डान्ससह निकालाचा भन्नाट क्‍लायमॅक्‍सही असेल अशी स्क्रिप्ट तरी तयार झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com