Loksabha 2019 : जिल्ह्याच्या विकासाचे इंजिन सांगली व्हावे

Loksabha 2019 : जिल्ह्याच्या विकासाचे इंजिन सांगली व्हावे

वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे आणि राहिले पाहिजे. महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी आणि पूर्व भागासाठी सिंचनाबरोबरच उद्योगाच्या संधी निर्माण करणे हा माझा पुढील पाच वर्षांसाठीचा अजेंडा असेल, असे सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगितले.

विद्यमान खासदार जिल्ह्यासाठी ३० हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा करतात. भाजपच्या थापाडेपणाची  लागण झाल्याचे हे लक्षण आहे. मग हा निधी गेला कुठे? ज्या सिंचन योजनांचा ते गवगवा करीत आहेत. आम्ही पाच वर्षांपूर्वी जत तालुक्‍यात पाणी नेले होते आणि आज तेच खासदार आम्ही जत तालुक्‍यातील वंचित गावांसाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार करू असे सांगतात. पूर्व भागातील अनेक गावे आज दुष्काळाने होरपळताहेत. सिंचन योजनांची पूर्तता करून जिल्हा संपूर्ण  दुष्काळमुक्त करणे आणि या भागात कृषिपूरक उद्योगांसाठी प्रयत्न करणे हा माझ्या दुष्काळी भागासाठीच्या कामाचा प्राधान्यक्रम आहे.

उद्योगांची वाट लागली; नवा उद्योग नाही
सांगली-मिरज परिसर विकासाचे मध्यवर्ती केंद्र राहिले. गेल्या पाच वर्षांत इथल्या उद्योगांची काय दयनीय  अवस्था झालीय हे एकदा खासदारांनी जिल्ह्यातील एमआयडीसीत जाऊन बघावे. जवळच्या चार उद्योजकांच्या प्रॉपर्टी किती वाढल्या यावर उद्योगाची  स्थिती ठरवू नका. मेक इन इंडिया, स्टार्टअप, कौशल्य विकास अशा भाजपच्या जाहिरातबाजीच्या योजनांचे जिल्ह्यात काय झाले हे खासदारांनी पुढे येऊन सांगावे. किती नवे उद्योग या शहरात सुरू झाले. किती बेरोजगारांना इथे नव्याने रोजगार मिळाला. महाविद्यालयात खाद्यमेळावे-प्रदर्शने भरवून देशस्तरावरील उद्योजक सांगलीत कसे येणार? गेल्या पाच वर्षांत सांगली-मिरजेसाठी खासदार निधीतून गल्लीबोळातील  रस्ते करण्यापलीकडे नेमके वेगळे तुम्ही काय केले? ही कामे नगरसेवक करतात. खासदार त्यांचे नारळ फोडतात. किती खालच्या पातळीवर जाऊन मार्केटिंग करायचे ? खासदारांकडून अपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्या कसोटीवर लाटेत विजयी झालेले पूर्ण अपयशी ठरलेत.
  
पालिका परिसरावर फोकस हवा
मोदी देशभर स्मार्ट सिटीचा डंका पिटत आहेत. आपल्या महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश दिवास्वप्न ठरले. सांगलीबाबत भाजपच्या-खासदारांच्या मनात अढी आहे. पालिकेतील काँग्रेसच्या सत्तेची त्यांनी कोंडी केली. निवडणुकीत १०० कोटींचे स्वप्न दाखवले.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किती महापालिकांना असे पैसे दिले? इथेही तेच होणार. सांगली-मिरज-कुपवाडच्या विकासाकडे खासदारांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केलेय. पालिकेतील जनताच त्यांना धडा शिकवेल. हमाल, कष्टकरी, उच्चभ्रू अशा सर्व स्तरांत प्रचारा दरम्यानची ती लोकभावना मला जाणवतेय. सांगली-मिरज-कुपवाड ही तीन शहरे आणि सभोवतालचा तीस चौरस किलोमीटरचा परिसर नजरेसमोर ठेवून उद्योग विस्ताराचे नियोजन केले पाहिजे. इथे पाणी-जागेची मुबलकता आहे. हे जिल्ह्याच्या विकासाचे इंजिन आहे आणि ते सतत धडधडत ठेवले पाहिजे. 

संघ संस्थांच्या मालमत्तांवर त्यांचा डोळा
पाच वर्षांत जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे. अनेकांचे सातबारा परस्पर नावावर केल्याचे शहरात चर्चा आहे.  खासदारांच्या कचाट्यातून संघविचारांच्या संस्थाही सुटल्या नाहीत. त्यांच्या जागावर त्यांनी डोळा ठेवून केलेली कारस्थाने आता लपून राहिलेली नाहीत. वसंतदादांचे कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांच्यासारख्या अनेक संघस्वयंसेवकांशी घरोब्याचे संबंध होते. संघ विचारांच्या अनेक शैक्षणिक संस्थांना आमच्या कुटुंबाने सढळ हाताने मदत केली. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे हा आमच्यावरील संस्कार आहे. खासदारांना मात्र जमिनी मालमत्तांच्या मोहात संघाच्या मदतीचाही विसर पडला. 

शेतकऱ्यांचा झेंडा प्राण असेपर्यंत...
स्वाभिमानीची उमेदवारी घ्यायची माझ्यावर वेळ आली. मात्र हा निर्णय पूर्ण विचारानेच घेतलाय. मला त्यात  वावगे वाटत नाही. देश, राज्य स्तरावरील आघाडी धर्माचाच तो भाग आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील, काँग्रेस नेते विश्‍वजित कदम यांनी ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. गैरसमज दूर झाले आहेत. आता आम्ही एकसंधपणे लढत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपब्लिकन आणि स्वाभिमानी अशी एकसंध महाआघाडी प्रचारात आहे. इतिहास मागे टाकून भविष्यासाठी सिद्ध झालो आहोत. वसंतदादांनी आयुष्यभर शेतकरी हिताचेच राजकारण केले. ते शेतकऱ्यांची संघटना स्थापन करणार होते. मला संघटनेची उमेदवारी मिळाली हा नियतीचाच भाग असावा. स्वाभिमानीची उमेदवारी आमच्या विचारांचीच आहे. प्राण असेपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा झेंडा मी खाली ठेवणार नाही.

त्यांना शेतकरी माफ करणार नाहीत..
सहकारी कारखानदारीसमोरील संकटांमुळे वसंतदादा साखर कारखाना अडचणीत आला. मात्र, तो कधी  गिळंकृत करण्याचा विचार यत्किंचितही मनात आणला नाही. मात्र खासदारांनी दिनकरआबांचे जीवनस्वप्न असलेला कारखाना बंद पाडला. उगार शुगर्सला त्यांनी कसे बाहेर काढले हे एकदा राजाभाऊ शिरगावकरांकडून ऐकले पाहिजे. हा कारखाना खासगी प्रॉपर्टी करण्यासाठी कारस्थान केले. संपतनाना मानेंचे स्वप्न असलेला  यशवंत कारखानाही त्यांनी असाच गट्टम केला. ही शेतकऱ्यांची मंदिरे त्यांनी उद्‌ध्वस्त केलीत. त्यांना शेतकरी माफ करणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com