सुभेदारांच्या बंडाची किंमत किती?

Sharad-Pawar
Sharad-Pawar

सातारा - लोकसभेच्या रणांगणातील योद्‌ध्यांची यादी तयार होत असतानाच राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील सुभेदारांनी बंडाचे निशाण जोरात फडकवायला सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या एकंदर राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंमत देणार का, की पक्षाचा निर्णय अंतिम म्हणत हे बंड केवळ पेल्यातले वादळच ठरणार, असा प्रश्‍न सातारकरांच्या मनात उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपापल्या निवडणुकीतील रणनीतीवर अंतिम हात फिरविण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्याच्या बाबतीत म्हणायचे तर, युतीचे घोडे अद्याप रेंगाळले असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अद्याप आपला या निवडणुकीत ‘रोल’ काय असणार, हेच स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ते तिढी टाकून निवांत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र, उलथा-पालथींनी वेग घेतला आहे. माढ्यात विजयसिंह की प्रभाकर देशमुख, अशी चर्चा सुरू असतानाच अचानक थेट पक्षाध्यक्षच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले. त्यामुळे बालेकिल्ल्यात स्वत: अध्यक्षच लढणार असल्याचा आनंद जिल्हावासीयांना नक्कीच झाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात पक्षामध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच साताऱ्याच्या उमेदवारीवरून मात्र, पुन्हा रणकंदन सुरू झाले आहे.

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार असल्याचे दिल्लीमधील लोकांना सांगण्यासाठी शरद पवारांना चांगले वाटणारे नाव. परंतु, त्यांना राष्ट्रवादीने तशी जुलमानेच संधी दिली. सध्या त्यांना विरोध करण्यासाठी बंडाचे निशाण फडकवणाऱ्यांनी २००९ मध्ये पांढरे झेंडे दाखवले नसते तर, आताचे सातारा लोकसभेचे चित्र वेगळे असते. उदयनराजे कसे 
आहेत, ते कसे वागणार, याचे पक्षाध्यक्ष शरद पवारांना चांगलेच भान होते. परंतु, पुनर्रचनेनंतर झालेल्या मतदारसंघांचा अंदाज न आल्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सध्याच्या विरोधकांनी उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. साताऱ्यात असलेले मनोमिलन आणि शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका ही त्याला कारणीभूत होते.

सातारा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जावळी, कोरेगाव व कऱ्हाड उत्तर या तीन मतदारसंघांमध्ये विभागला गेला. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पाचपैकी तीन आमदार सातारा तालुक्‍यातील जनतेच्या भूमिकेवर अवलंबून आहेत. त्यात ताकद आहे ती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची. ते कोणाच्या बाजूने, हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे अन्य दोन आमदारांना काय करायला पाहिजे, हे समजत असूनही भूमिका घेता आली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या बाजूचे पारडे जड झाले आणि ते राष्ट्रवादीच्या मुळावर बसले. त्यानंतर या निर्णयाचा राष्ट्रवादीला जिल्हा परिषद असो, नगरपालिका, पंचायत समिती किंवा विधान परिषदेच्या निवडणुका व पदाधिकारी निवडीत प्रत्येक वेळी फटका बसलेलाच आहे.

आता मनोमिलन तुटले आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात थेट भूमिका घेतली, त्याच ताकदीने उत्तराला प्रत्युत्तर दिले. त्यांची भूमिका स्पष्ट झाली. केवळ त्या आणि त्यामुळेच उदयनराजेंचे उपद्रवमूल्य माहीत असूनही सर्व आमदारांनी एकमुखाने शिवेंद्रसिंहराजेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. पक्षाध्यक्ष उपस्थित असूनही उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर सर्वांनी बहिष्कार टाकला. कारण जिल्ह्याच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक तसेच आमदार यांची गणिते बदलू शकतात, याची त्या आमदारांना चांगलीच जाणीव आहे.

ठोस भूमिकेअभावी अनेकदा राजकारणातील संधी गमवाव्या लागतात, अडचणी वाढतात. त्याचीच प्रचिती सध्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या धुरिणांना अनुभवायला येत आहे. आताही शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक थेट शरद पवार यांना भेटायला बारामतीत जातात. दुसऱ्याच दिवशी साताऱ्यात बैठक होते. उदयनराजेंचे काम न करण्याचा निर्णय होतो. परंतु, आमदार म्हणतात मला काही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीतील अन्य आमदार काय भूमिका घेणार? त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांची अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली आहे.

मनसुबे फळाला येतील का?
उदयनराजेंची सातारा शहर केंद्रित कार्यशैली, मतदारसंघातील अन्य भागांतील विकासकामांचा अभाव यामुळे प्रामुख्याने कऱ्हाड व पाटण परिसरातील उदयनराजेंविरोधात सध्या नाराजीची भावना आहे. परंतु, पक्षांतर्गत ठाम व कणखर भूमिका असल्याशिवाय मनसुबे फळाला येतील का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या नजरेत सातारच्या सुभेदारांच्या म्हणण्याला किंमत आहे का, हे थोड्याच दिवसात समोर येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com