गडहिंग्लजच्या प्रश्‍नांकडे मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देणार का? 

गडहिंग्लजच्या प्रश्‍नांकडे मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देणार का? 

गडहिंग्लज - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सौर उर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज (ता. 19) गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. शहरासह तालुक्‍यात अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

गडहिंग्लजची हद्दवाढ झाली असून वाढीव हद्दीच्या विकासासाठी निधीची अपेक्षा, हिरण्यकेशी नदीतील पाण्याचा उपसा करून तालुक्‍यातील विविध तलाव भरून घेणे, बेरोजगारी संपवण्यासाठी प्रकल्पांची उभारणी, तालुक्‍यातील प्रलंबित वीज कनेक्‍शनसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आदी महत्वाच्या प्रश्‍नांकडे मंत्री पाटील लक्ष देणार काय, असा प्रश्‍न जनतेतून विचारला जात आहे. 

राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता आहे. शासनातील महत्वाचे घटक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विविध महत्वाच्या खात्यांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गडहिंग्लजच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांसाठी त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महत्वाच्या प्रश्‍नांची सोडवणूक होण्याच्यादृष्टीने त्यांच्याकडून आजच्या दौऱ्यात घोषणा व्हावी अशी अपेक्षाही तालुक्‍यातील जनतेची आहे. मोठ्या विकासकामांसह पाणंद रस्ते, गावागावाला जोडणारी महत्वाची पक्की रस्ते, खेड्यांमधील अंतर्गत रस्त्यांचा विकास होणेही अपेक्षित आहे. 

गडहिंग्लजच्या वाढीव हद्दीचा विकास 
शहराची हद्दवाढ झाली आहे. बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील तीसहून अधिक वसाहती पालिका हद्दीत आले आहेत. या वाढीव हद्दीतील विकासाचा अजेंडा येणाऱ्या निधीवर अवलंबून आहे. तेथील आरोग्य सेवा, पथदिवे, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आदी मुलभूत सुविधा पुरवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठोस असा निधी गरजेचा आहे. भरघोस निधी मिळाल्यास वाढीव हद्दीचा विकास होवून एक मॉडेल शहर म्हणून गडहिंग्लज पुढे येईल. 

सांडपाणी, रिंगरोड, नाट्यगृह 
शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अत्यंत आवश्‍यकता आहे. त्यासाठी पालिकेने इस्टिमेट करण्याचे कामही सुरू केले आहे. या प्रकल्पाला कोट्यवधींचा खर्च आहे. नदीवेस भागात सध्याच्या सांडपाणी बंधाऱ्याजवळच हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यास हा महत्वाचा प्रश्‍न सुटू शकतो. पालिकेचा नाट्यगृहासह बहुउद्देशीय सभागृहाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जागाही राखीव ठेवली आहे. शहराला नाटकांची परंपरा आहे. केवळ नाट्यगृह नसल्याने ही परंपरा खंडीत झाली आहे. पालिकेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देवून शासनाकडून निधी खेचून आणण्यात पालकमंत्र्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडचा पर्याय अमलात आणला. यातील काही भाग पूर्णही झाला आहे. परंतु, भूसंपादनाच्या प्रश्‍नामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यात अडचणी येत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे जमीनीची भरपाई देण्यात पालिकेची तितकी आर्थिक कुवत नाही. यामुळे शासनाकडून भूसंपादनासाठी भरीव पॅकेजची गरज आहे. 

क्रीडा संकूल, प्रशासकीय इमारत 
गडहिंग्लज शहरासह तालुक्‍याची क्रीडा परंपराही उज्ज्वल आहे. येथील फुटबॉलला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानामुळे येथे क्रीडासंकूल मंजूर झाले. परंतु, अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. प्रशासकीय यंत्रणेतच त्याची उदासिनता अधिक जाणवत आहे. तसेच, सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतही मंजूर आहे. परंतु, जागेची उपलब्धतता नसल्याने हा प्रश्‍नही तडीला गेलेला नाही. या दोन्ही प्रश्‍नात पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यास सहज सुटू शकतात, अशी भावना खेळाडू व जनतेची आहे. 

पर्यटन विकास 
तालुक्‍यात ऐतिहासिक किल्ले सामानगड, श्री काळभैरी मंदिर डोंगर, श्री गुड्डादेवी मंदिर परिसर, इंचनाळचे पेशवेकालीन गणेश मंदिर परिसराचा विकास अपेक्षित असा झालेला नाही. तालुक्‍यात पर्यटनासाठी काही मोजक्‍या ठिकाणांपैकी ही ठिकाणे आहेत. पर्यटन विकासासाठी या भागाचा कायापालट करणे गरजेचे आहे. किल्ले सामानगडावर अनेक ऐतिहासिक स्थळे विकासाअभावी पडद्याआड आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठानने आपल्या कुवतीनुसार एकेक स्थळांची स्वच्छता सुरू केली आहे. सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक स्थळाचाही अजून व्यापक विकास होवू शकतो. या सर्व पर्यटन विकासासाठी भरीव निधीद्वारे प्रयत्न झाल्यास निश्‍चित ही ठिकाणे पर्यटकांनी बहरतील. 

पाणी टंचाईवर कायमची मात हवी 
तालुक्‍यात विशेष करून पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असते. परिणामी तेथील अनेक तलाव पाण्याने भरत नाहीत. यामुळे त्या भागातील 25 हून अधिक खेडी तहानलेली असतात. तेरणी, येणेचवंडी, हलकर्णी येथील तलाव हिरण्यकेशी नदीतील पावसाळ्यातील पाण्याने भरून घेतल्यास त्याचा उपयोग होईल. कर्नाटकच्या धर्तीवर योजना राबवण्यासाठी 20 कोटीहून अधिक रक्कमेचा निधी गरजेचा आहे. त्याचाही विचार पालकमंत्र्यांनी करावा, अशी अपेक्षा आहे. याशिवाय आजरा तालुक्‍यातील आंबेओहोळ, उचंगी आणि सर्फनाला या मध्यम प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न झाल्यास गडहिंग्लज तालुका शंभर टक्के हिरवेगार होणार आहे. या अर्धवट प्रकल्पांना निधीचा डोस गरजेचा आहे. 

एमआयडीसीत प्रकल्प गरजेचे 
गडहिंग्लजची एमआयडीसी प्रकल्पांविना ओस पडली आहे. परिणामी तालुक्‍यातील तरूण बेरोजगारीच्या संख्येत वाढच होत आहे. उच्च शिक्षण घेवूनही तरूणांना सेंट्रींग, गवंडी आदी कामावर जावे लागत आहे. पुण्या-मुंबईला तरूणांचे लोंढे रोजगारासाठी जात आहेत. येथील बरोजगारी संपवण्यासाठी एमआयडीसीमध्ये एखादा मोठा प्रकल्प येणे आवश्‍यक आहे. मेक इन इंडिया, महाराष्ट्र या संकल्पातून एखादा प्रकल्प गडहिंग्लज एमआयडीसीत आल्यास बेरोजगारी संपेल. यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा तरूणांची आहे. 

वीजेचा प्रश्‍न 
महावितरण कंपनीकडे अनेक कृषी पंपाचे कनेक्‍शन अनामत रक्कम भरूनही वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. पाणी असूनही केवळ कनेक्‍शन नसल्याने पीके करपत आहेत. वर्षानुवर्षे प्रतिक्षायादी वाढत असून मागणीनुसार कनेक्‍शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. त्यासाठी ठोस धोरण अवलंबून प्रतिक्षा यादीसह सर्व गरजू शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वेळेत वीज कनेक्‍शन देवून शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्‍न सोडवावा अशीही मागणी आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com