पावनखिंडीतील फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करू - संभाजीराजे

पावनखिंडीतील फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करू - संभाजीराजे

कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करु, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

संसद आदर्श ग्राम योजना येळवणजुगाई अंतर्गत पांढरेपाणी येथे बहूउद्देशिय हॉल पायाभरणी व सह्याद्री प्रतिष्ठानतफे आयोजित पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पन्हाळगड ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक शिवभक्त पदभ्रमंतीचे आयोजन करत असतात. दोन वर्षांपूर्वी मी या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी होऊन शिवभक्तांच्या समवेत मोहिम पूर्ण केली होती. मुळातच या भागात अतिवृष्टी होत असते, त्यातही हा मार्ग अतिशय खडतर व शरीराची क्षमता पाहणारा आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची राहण्याची गैरसोय होते हे माझ्या लक्षात आल्याने या मार्गावर 'पांढरपाणी' येथे भव्य सांस्कृतिक भवन व निवासगृह बांधण्याचे निश्चित केले होते. या सांस्कृतिक भवन व निवासगृहाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना मनस्वी आनंद होत आहे. 

पावनखिंड - विशाळगड भागात येणाऱ्या शिवभक्तांसाठी येथे बहुउद्देशीय सभागृहासाठी पन्नास लाखांवर निधी संभाजीराजेंनी उपलब्ध केला आहे.

यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार,        इंद्रजित सावंत, डॉ.रमेश जाधव, डॉ. वसंतराव मोरे, भगवान चिले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सत्यजित पाटील यांनी मनोगत  व्यक्त केले. 

मुसळधार पाऊस, बोचरा वारा व चिखलमय वाटा अशा वातावरणात सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड परिसर पदभ्रमंती मोहीम सुमारे दोनशे मोहीमवीरांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. पन्हाळगडावरून निघालेली शिवभक्तांची वारी दुसऱ्या दिवशी पांढरेपाणी येथे आल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, आमदार रमेश लटके यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर पालखी मिरवणूक पावनखिंड परिसरात नेण्यात आली. बाराबंदी पोशाखातील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत पालखी मिरवणूकीचा मार्ग दणाणून सोडला. पावनखिंड परिसरातील फरसबंदी मागाचे पूजन करण्यात आले. सिद्धी जोहरच्या सैन्याबरोबर लढताना धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे बांधकाम सभपती सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, सरपंच वल्सला चव्हाण, डी. वाय. एस.पी. बाजीराव पाटील, राजाराम चव्हाण, सह्यद्री पदभ्रमतीचे प्रमुख हेमंत साळुखे, चेतन बिरंजे, सत्यवान खेतल, सुहास पाटील, आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com