आषाढी निमित्त पुईखडीवर अमाप उत्साहात रिंगण सोहळा 

आषाढी निमित्त पुईखडीवर अमाप उत्साहात रिंगण सोहळा 

कोल्हापूर - "पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला' म्हणत भक्तिगीते, अभंग आणि "माऊली माऊली' च्या जयघोषात आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी झाली. वारकऱ्यांच्या अभंग आणि टाळमृदंगाच्या गजरात पुईखडी येथे माऊलींचा रिंगण सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. 

श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित या प्रति पंढरपुर पायी दिंडीत अबाल वृद्धांनी सहभाग घेत विठू नामाचा गजर केला. 

नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या या मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. कोल्हापूर येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ व जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाच्या वतीने गुरुवारी नगरप्रदक्षिणा झाली. आज मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचे नंदवाळकडे प्रस्थान झाले.

फुलांनी सजवलेला रथ, चांदीची पालखी, त्यामध्ये पादुका व ज्ञानेश्वरी, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला व विठूनामाचा जयघोष करत शिस्तबद्धरीत्या निघालेले हजारो भाविक, अशा भक्तिमय वातावरणात ही दिंडी मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक, उभा मारूती चौक, खंडोबा तालीम येथे आणि या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. यानंतर पुन्हा दिंडी नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ झाली. जुना वाशी नाका, क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर मार्गे ही दिंडी लवाजम्यासह पुईखडी येथे आली. या रस्त्यावर विविध संस्था-संघटनांच्या वतीने भाविक भक्तांसाठी उपवासाच्या पदार्थाचे, प्रसादाचे वाटप करण्यात आले. 

दुपारी दीडच्या सुमारास मुख्य दिंडी व पालखी पुईखडी येथे आली. आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, महापालिका स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत अश्व पूजन झाले. या नंतर प्रथम वारकऱ्यांचे गोल रिंगण पार पडले. त्यानंतर अश्वांनी रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्याने उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रिंगण सोहळ्या नंतर रिंगन मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. यानंतर नंदवाळकडे दिंडी रवाना झाली. या सोहळ्यात 30 हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. 

लहान मुलांची लक्षवेधी वेशभूषा 
या पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसह तरुण-तरुणी आणि लहान मुलांचाही लक्षणीय सहभाग होता.विशेषतः दिंडीत सहभागी लहान मुलांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. अनेक मुले विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत आपल्या पालकांचा हात धरून रिंगण सोहळ्याच्या दिशेने जात होते. इतर भाविक कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत त्यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होते. 

दिंडी मार्गाची केली स्वच्छता 
दिंडी मार्गावर अनेक पक्ष संघटना संस्थांच्या वतीने भाविकांसाठी राजीगरा लाडू, केळी, चहा, कॉफी, खिचडी तसेच उपवासाच्या पदार्थाची वाटप करण्यात आले. या फराळाचा आस्वाद घेत भाविक नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ होत होते. त्यामुळे वारी मार्गात कागद,प्लस्टिक तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर पडला. एकटी सामाजिक संस्था व भक्ती सेवा ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी दिंडी मागून येत लागलीच हा कचरा जमा केला. दरम्यान तायक्वांदो अकॅडमी व युनिक अकॅडमीच्या स्वयंसेवकांनी वारी मार्गात शिस्त राखण्यासाठी प्रयत्न केले. 

हुल्लडबाजांचाही वावर 
टाळ-मृदुंग आणि अभंगाच्या साथीने विठ्ठल नामात दंग होत हजारो भाविक या पायी दिंडीत सहभागी झाले असताना हुल्लडबाचाही वावर या गर्दीत ठळकपणे दिसला. "उद ग आई उद," "विठ्ठला च्या नावानं चांगभलं" अशा विनाकारण जयघोष करत काही तरुण भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर काही तरुणांचे घोळके अश्‍लील शेरेबाजी करताना दिसत होते. 

लहान मूले हरवली 
पुईखडी येथे हजारो भाविकांच्या गर्दीत काही लहान मुले हरवली. माईकवरून अशा मुलांना बद्दलची माहिती देण्यात येत होती. काही वेळाने ही मुले सापडत असले तरी या काळात पालकांची होणारी घालमेल स्पष्टपणे दिसत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com