नक्षलवादी होण्यासाठी ऑफर

नक्षलवादी होण्यासाठी ऑफर

नगर - दरोडा, खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी काळे (मूळ रा. सलाबतपूर, ता. नेवासे, सध्या रा. सुदर्शननगर, वर्धा) याला ‘अण्णा’ नावाच्या नक्षली नेत्याने नक्षलवादी बनण्यासाठी दरमहा पाच लाखांची ऑफर दिली होती. पण, ती पपड्याने नाकारल्याचे त्याने स्वतःच पोलिसांना सांगितले.

कोळपेवाडी दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पपड्या याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला नक्षलवाद्यांची ऑफर होती, अशी कबुली खुद्द पपड्याने दिली. तो म्हणाला, की जबलपूर (मध्य प्रदेश) येथील एका दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. त्यात विशाखापट्टणम कारागृहात हलविण्यात आले होते. त्या कारागृहात अनेक नक्षलवादी होते. अण्णा नावाचा नक्षलवाद्यांचा नेता तेथे होता. त्याचे पूर्ण नाव माहीत नाही. कारागृहात त्याचा दरारा होता. सर्वच जण त्याला घाबरत होते. त्यामुळे कारागृह अधीक्षक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. त्याची आणि माझी कारागृहात भेट झाली. त्याने बऱ्याच गोष्टी विचारून घेतल्या. गेल्या २००१ मध्ये झालेल्या लाडखेड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकाच्या खुनाच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र माझ्या विरुद्ध दाखल करण्यात आले होते. ते अण्णाने वाचले. पोलिसाला मारल्याचे पाहून तो खूश झाला. त्याने मला पाच लाख देतो, आमची एक तुकडी सांभाळायची आणि पोलिसांची वाहने उडवून द्यायची. त्याबद्दल तुझ्या मुलांच्या शिक्षणाची आम्ही सोय करू. वरिष्ठ नेत्यांकडून जसे पैसे येतील तसे तुला देऊ, अशी ऑफर दिली. मात्र, ती ऑफर आपण स्वीकारली नाही. ‘आम्ही गुन्हे करतो ते पोटासाठी, पोलिसांना मारण्यासाठी नाही,’ अशी कबुली पपड्याने दिली.

नक्षली हद्दीत पपड्याचा वावर 
पपड्या संपूर्ण भारतात गुन्हे करीत फिरणारा अट्टल गुन्हेगार आहे. अनेक गुन्हे दाखल होऊनही त्याचा शोध लागला नाही. नागपूर, अमरावती, गडचिरोली, मध्य प्रदेश, दंतेवाडा (छत्तीसगड) येथे पपड्याचा वावर अधिक होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com