नवविवाहितेवर बलात्कार प्रकरणी स्वामी, आशिष पाटीलसह मुल्लावर गुन्हा दाखल

नवविवाहितेवर बलात्कार प्रकरणी स्वामी, आशिष पाटीलसह  मुल्लावर गुन्हा दाखल

कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम सत्तार मुल्ला (२९, रा. यादवनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत.

मध्यरात्री तिघांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. मात्र, ते हाती लागले नाहीत. चार पथकांद्वारे त्या तिघांचा शोध सुरू आहे. घटनेमुळे खासगी सावकारांची निर्दयता पुढे आली आहे. याची गांभीर्याने दखल घेतल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी स्पष्ट केले.  

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शहरातील एका अभियांत्रिकी पदवीधर नवविवाहितेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील एका तरुणाशी तिचा प्रेमविवाह झाला. पती स्नूकर क्‍लबचा व्यवसाय सुरू करणार होता. त्यासाठी त्याने मित्र स्वामीकडून ३० हजार रुपये घेतले.

काही दिवसांनंतर हरिषने त्या रकमेवर दर दिवसाला तीन हजार रुपयांच्या व्याजाची मागणी सुरू केली. त्या बदल्यात पतीने त्याला १० हजार ५०० रुपये दिले. मात्र, त्यानंतर ते व्याज देणे त्यांना शक्‍य झाले नाही. त्यामुळे हरिषने त्याच्या घरात येणे जाणे वाढवले. मार्चमध्ये झालेल्या रंगपंचमीनंतर दोन ते तीन दिवसांनी हरिषने नवविवाहितेला फोन केला.

‘पैशाबद्दल बोलायचे आहे. एकदा विषय मिटवू’, असे सांगून त्यांना चर्चा करण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर तो मोटारीतून नवविवाहितेला घेऊन कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानावर गेला. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर हे प्रकरण मिटेल, असे तिला वाटले म्हणून ती गप्प राहिली. मात्र, त्यानंतरही तिच्यावर त्याने पुन्हा बलात्कार केला. त्याचबरोबर अमानुष अत्याचारही केले. त्याचे मित्र संशयित आशिष पाटील व सद्दाम मुल्ला यांनीही तिला गाठले. त्या दोघांनी ‘तुझी अश्‍लील चित्रफीत तयार केली आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल करू’, अशी धमकी तिला देत अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला.

काल मध्यरात्री हरिष, आशिष व सद्दाम हे त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्या तिघांनी तिच्या पतीला मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्काराचाही प्रयत्न केला. मात्र, तिने मोठा ओरडा केल्याने ते पसार झाले, अशी पीडित विवाहितेने फिर्याद दिली, तशी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. याप्रकरणी संशयित हरिष, आशिष आणि सद्दाम यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचे कट्टे यांनी सांगितले.

खासगी सावकारीच्या वसुलीतून घडलेल्या या प्रकाराची गांभीर्याने पोलिस प्रशासनाने दखल घेतली. तिघा संशयितांच्या शोधासाठी मध्यरात्रीच त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. मात्र, त्यापूर्वीच ते पसार झाले होते. त्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तिरित्या शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, पीडितेच्या पतीचा जबाब नोंदविला. तसेच पीडितेच्या रुईकर कॉलनी परिसरातील घराची पाहणी करून पंचनामाही केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ करीत आहेत. 

चार पथकांद्वारे शोधमोहीम...
तिघा संशयितांचा शोध चार स्वतंत्र पथकांद्वारे सुरू केला आहे. त्यातील एक पथक कर्नाटक व दुसरे गोवा येथे गेले आहे. संशयितांचे मोबाईल सकाळी साडेनऊपर्यंत सुरू होते. मात्र, त्यांचे लोकेशन सतत बदलत होते. त्यानंतर त्या तिघांचेही फोन स्विच ऑफ झाले. तसेच त्यांच्याकडील वाहनांच्या क्रमांकावरूनही नाकाबंदीद्वारे शोधमोहीम सुरू आहे. लवकरच त्यांच्या मुसक्‍या आवळल्या जातील, असे कट्टे यांनी सांगितले. 

गंभीर गुन्हे दाखल...
तिघा संशयितांवर बलात्कार, अपहरण करणे, घरात बळजबरी प्रवेश करणे, मारहाण करणे, अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देणे, सामूहिक बलात्काराचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे कट्टे यांनी सांगितले. संशयित मुल्लावर यापूर्वी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा झाल्याची माहितीही पुढे आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com