रेठरे बुद्रुक... ‘बासमती, इंद्रायणी तांदळा’चे गाव

रेठरे बुद्रुक - डौलदार व दाणेदार भात पीक.
रेठरे बुद्रुक - डौलदार व दाणेदार भात पीक.

रेठरे बुद्रुक - तिन्ही बाजूंनी वाहणाऱ्या कृष्णाकाठी वसलेले रेठरे बुद्रुक हे गाव जसे राज्यभर कृष्णा साखर कारखान्यामुळे ओळखले जाते, तसेच ते माजी मंत्री यशवंतराव मोहिते, त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांच्यामुळे ओळखले जाते. कॅप्टन शंकरराव मोहिते व जुन्या पिढीतील प्रगत शेतकरी आबासाहेब मोहिते हेही याच गावचे. मात्र, या गावाला ७० च्या दशकानंतर तांदळाचे रेठरे म्हणून नवीन ओळख प्राप्त झाली आहे. 

रेठऱ्याच्या शेतजमिनीच्या अंगची नैसर्गिक गुणवत्ता ही तांदूळ उत्पादनासाठी इतकी पोषक आहे की, सुवासिक, चवदार बासमती आणि इंद्रायणी तांदूळ पिकवणारे हे गाव साखरेबरोबर तांदूळ पिकवणारा दुसरा कारखाना बनलेले दिसते. त्यामुळे तांदळाच्या माध्यमाने या गावाची ओळख आता अटकेपार पोचली आहे. गावची एकूण लोकसंख्या २५ हजारांच्या घरात पोचली आहे. सुमारे तीन हजार एकर काळी व चोपणयुक्त शेती गावाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात गावात साखर कारखाना सुरू झाल्यानंतर बागायती शेतीत ऊस पीक व्हायचे. तद्वत काळी कुसळी, आंबेमोहर व दोडकी भाताचे पीक घेतले जायचे. १९७० मध्ये आबासाहेब मोहिते यांनी नैनिताल (हिमाचल प्रदेश) येथून तांदळाच्या बासमती ३७० नंबरचा वाण आणून तो त्यांनी आपल्या शेतात पेरला.

तेव्हापासून पारंपरिक भातपिकाला फाटा देवून शेतकरी बासमतीच्या तांदूळ पेरणीकडे वळले. सुरवातीला नवलाई असल्यामुळे शेतकऱ्यांनी बासमतीचे उत्पन्न घेतले. परंतु, या पिकातील उत्पन्न कमी असल्याने गावातील शेतकरी बाळकृष्ण कदम, अशोक सूर्यवंशी व अशोक पवार यांनी वडगाव- मावळ (जि. पुणे) येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रातून इंद्रायणी वाणाचे बियाणे आणले व त्याची पहिल्यांदा लागवड केली. बासमती व इंद्रायणी भात पिकाला पोषक असलेले मातीतील गुणधर्म रेठऱ्यातील शेतीमध्ये आहेत. शास्त्रज्ञांच्या मते गावच्या तिन्ही बाजूने वाहणाऱ्या नदीतील पाण्याच्या बाष्पीभवन व आर्द्रतेचा फायदाही या पिकाच्या उत्पादन, चव आणि सुवासिकपणास कारणीभूत ठरत असल्याने रेठऱ्यामध्ये उत्पादित होणारा बासमती व इंद्रायणी तांदूळ गुणवत्तापूर्ण व दर्जेदारपणा आजदेखील कमावून आहे. त्याबरोबरीने जवळच्या गोंदी व खुबीमधील शेतीमध्ये समांतर गुणधर्म असल्याने तेथून उत्पादित होणाऱ्या तांदळासही तितकाच दर्जा आहे.

बासमतीचे एकरी २८ पोती, तर इंद्रायणीचे ४० ते ४५ पोती उत्पन्न मिळत असल्याने सहाजिकच सर्रास शेतकऱ्यांचा कल इंद्रायणीकडे आहे. शक्‍यतो पेरपध्दतीने पिकाची लागवड होते. मनुष्यबळ असणारे शेतकरी रोप लागण पध्दतीचा अवलंब करतात. जादा उत्पादकतेमुळे सुमारे १५० एकरांवर दरवर्षी इंद्रायणीची पेरणी होते. तर इंद्रायणीच्या तुलनेत बासमतीचे कमी उत्पन्न होते व बिर्याणी स्पेशल असल्याने बाजारात त्याला दरही जास्त आहे. त्यातच मोजक्‍या गिऱ्हाईकांमुळे विक्रीचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे बासमतीचे उत्पादन घेणारे गावात बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी उरले आहेत.

भातापासून विक्रीयोग्य तांदूळ केल्यानंतर प्रत्येक घरामध्ये सुवास दरवळतो आणि या तांदळाला चवदेखील लाजवाब असल्यामुळे थेट जागेवरुन उत्पादित बासमती तांदळाची प्रति पायलीस ५५० ते ६०० रुपये, तर इंद्रायणीची प्रति पायली ३२५ ते ३५० रुपयांप्रमाणे विक्री होते.

पुण्या-मुंबईत ‘रेठरा बासमती तांदळा’चे फलक! 
सातारा व सांगली जिल्ह्यासह पुणे-मुंबईतही या दोन्ही तांदळांची जागेवरून खरेदी होते. रेठऱ्याचा बासमती आणि इंद्रायणी हा बाजारपेठेमध्ये ‘ब्रॅन्ड’ बनल्यामुळे पुण्या-मुंबईतील दुकानांपुढे ‘रेठरा बासमती तांदळा’चे फलक ग्राहकांना खुणावतात. रेठऱ्याच्या तांदळाची दुबईसह इतर देशातील भारतीय ग्राहकांनी खरेदी केल्याचे गावातील शेतकरी अभिमानाने सांगत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com