चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील

चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील

ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम केला आहे. २१ महाविद्यालयांत ४२०० विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली आहेत.

कोल्हापूरला विकासाच्या दृष्टीने न्यायचे झाले, तर अनेक गोष्टी येथे करायला हव्यात. जास्त लोकसंख्येचा उपयोग देशाच्या प्रगती आणि विकासात करायला हवा. त्यासाठीची धोरणे आणि पावले राजकर्त्यांनीही उचलायला हवीत. क्रीडा हे क्षेत्र मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याचे सांगून ऋतुराज म्हणाले, कोल्हापुरात कुस्ती आणि फुटबॉल हे खेळ लोकप्रिय आहेत; पण वैयक्तिक खेळांत आपण खूप मागे आहोत. वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यांनी ज्या प्रकारचे यश मिळविले, त्या प्रकारचे यश मिळविणारे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजेत. यासाठी मी प्रयत्नशील असतो. कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे खेळाडूंना जी मदत लागेल, ती देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेच. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने मी हे काम सुरू केले आहे. त्यांची या कामात मला नेहमी मदत असते. त्यामुळे भविष्यात कोल्हापूरचे अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आपल्याला दिसतील.

शहरातील सर्वांना व्यायामाची सवय लागावी, यासाठी आपण ओपन जिम सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी या जिम उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ‘ऑल इन जिम’ ही नवीन जिमही आपण ब्रह्मपुरी मैदानावर तयार केली आहे. आणखी काही ठिकाणी आपण सुरू करणार आहोत.

फुटबॉलसाठी टर्फ मैदानेही टप्प्याटप्प्याने बनविण्यात येणार आहेत. युवकांनी फिट राहण्यासंदर्भात त्यांच्यात प्रबोधन आणि त्यांना व्यायामासाठी जिम उपलब्ध करून देण्यात अग्रेसर राहिलो आहोत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कामाला भरीव निधी दिल्यामुळेच ही कामे करणे शक्‍य झाले आहे.
ही सर्व कामे करत असताना आमदार क्षीरसागर यांचे हात बळकट करणे, शिवसेनेशी, युवासेनेशी समाजातील घटकांना जोडणे आणि त्यांच्यासाठी विविध कामे करणे, उपक्रम राबविणे हे ध्येय घेऊन काम करत आहोत. ही सर्व कामे करताना समाजकारण डोळ्यासमोर ठेवून मी कार्यरत आहे.

समाजकारणावरच भर आहे. ही सर्व कामे करण्यात आमदार क्षीरसागर यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे तरुण वर्गाच्या कल्याणासाठी जे जे उपक्रम राबविता येणे शक्‍य आहे, ते आम्ही करत आहोत. राजेश चषक नावाने फुटबॉल स्पर्धाही गेल्या अनेक वर्षांपासून भरवत असून, कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंना या स्पर्धेमुळे आर्थिक हातभारही लागत आहे. आज स्पर्धाही वाढल्या आहेत; पण त्याची सुरवात आम्ही केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

प्रत्येक घरातील मुलगा सैन्यात जावा
देशावर येणारी संकटे पाहता, प्रत्येक घरातील एखादा मुलगा सैन्यदलात भरती होण्याची गरज आहे. अशाप्रकारे चीनमध्ये त्यांनी लोकसंख्येचा वापर करून घेतला आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्याकडेही अशाप्रकारे प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्येक घरातील मुलगा सैन्यदलात भरती व्हावा, यासाठीही नजीकच्या काळात आम्ही विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रबोधन घेऊ, असेही ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com