कोल्हापूरः लाच घेणाऱ्या आरटीओ, पंटरला सक्तमजुरी

कोल्हापूरः लाच घेणाऱ्या आरटीओ, पंटरला सक्तमजुरी

गडहिंग्लज -  ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सुपे (चंदगड) चेक पोस्टवरील तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (३८, रा. कोल्हापूर) याच्यासह पंटर समीर रवळनाथ शिनोळकर (३५, रा. यशवंतनगर, ता. चंदगड) या दोघांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी निकाल दिला.

सरकारतर्फे ॲड. एस. ए. तेली यांनी केलेला युक्तिवाद आणि सबळ पुराव्यामुळे आरोपींना शिक्षा झाली. तक्रारदार आकाश घोरपडे (रा. शिनोळी, ता. चंदगड) यांची लक्ष्मी मॅन्युफॅक्‍चर कंपनी आहे. त्यांचे चार ट्रक आहेत.

ट्रकवर कारवाई न करण्यासाठी सुपे चेकपोस्टवरील अधिकारी शिंदे याने मासिक हप्ता म्हणून १२ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १० हजार ठरले. २८ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी सहा वाजता शिंदे व शिनोळकर दोघांनाही घोरपडे यांच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. 

हा खटला येथील विशेष न्यायाधीश प्रतिनिधी यांच्यासमोर चालला. सरकारी वकील ॲड. एस. ए. तेली यांनी चार साक्षीदार तपासले. ॲड. तेली यांचा युक्तिवाद व सबळ पुराव्यामुळे या गुन्ह्यात शिंदे व शिनोळकरला न्यायालयाने दोषी ठरविले. शिंदेला दोन वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली. शिंदे याने या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. पंटर शिनोळकर यास तीन वर्षे सक्तमुजरी, १५ हजार दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद ठोठावली आहे. 

नऊ वर्षांत पहिली शिक्षा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गडहिंग्लज विभागात अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पकडले; परंतु अटक केलेले बहुतांशी विविध कारणांनी सुटले. दरम्यान, शिंदे व शिनोळकरला झालेली आजची ही शिक्षा नऊ वर्षांतील पहिलीच असल्याचे सरकारी वकील ॲड. एस. ए. तेली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com