आठ हजार शाखाप्रमुख शिवसेनेकडून नियुक्त

Shivsena
Shivsena

सातारा - येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, तळागाळापर्यंत शिवसेना पोचविताना प्रभागनिहाय शाखाप्रमुखांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात आठ हजार शाखाप्रमुखांची नेमणूक पूर्ण झाली असून, येत्या शनिवारी (ता. २७) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी भगवा सप्ताहाच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे. तद्वत आठ हजार महिला संघटिकांचीही नेमणूक होणार आहे. संघटनात्मक बांधणी करतानाच विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणीही पूर्ण केली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षसंघटना बांधणीत प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमण्यात आले आहेत. त्यासोबतच महिला संघटिकांची नेमणूक केली जाणार आहे. या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात १२ ते १५ हजार नवे कार्यकर्ते पक्षसंघटनेशी जोडले जाणार आहेत. परिणामी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास कुठेही कमी पडायला नको, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने पक्षबांधणीचे काम पूर्ण केले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात तब्बल आठ हजार प्रभागनिहाय शाखाप्रमुखांची नेमणूक केली आहे. या शाखाप्रमुखांना येत्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. यावेळेस संघटनेत स्त्रियांनाही संधी दिली गेली आहे. त्यासाठी महिला संघटिकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेनेत महिला संघटनवाढीस चालना मिळणार आहे.

पूर्वी शिवसेनेने गाव तेथे शाखा असे सूत्र बांधून पक्षाची वाटचाल केली. पण, पक्ष तळागाळापर्यंत पोचण्यासाठी यामध्ये बदल करून प्रभागनिहाय शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसाठी हा ‘प्लस पॉइंट’ ठरणार आहे. लवकरच विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेचे मेळावे सुरू होणार आहेत. शासनाने शेतकऱ्यांबाबत घेतलेले निर्णय आणि आगामी काळात काय निर्णय घेतले जाणार आहेत, याची माहिती शिवसेनेचे नेते गावागावापर्यंत पोचविणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com