सोलापूर : संयुक्ता आणि सोमनाथचा मृत्यू प्रेमप्रकरणातून झाल्याचा पोलिसांचा संशय

solapur
solapur

सोलापूर : मार्डी परिसरात मृतदेह सापडलेल्या संयुक्ता रमेश भैरी (वय 24, रा. मार्कंडेय वसाहत, सोलापूर) हिचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. तिचा कॉलेजचा वर्गमित्र सोमनाथ तारनाळकर (वय 24, सध्या रा. सोलापूर, मूळ- कलबुर्गी) याने सोमवारीच विजयपूर येथील गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. संयुक्ताचा मृत्यू आणि सोमनाथची आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटी ते मार्डी रस्त्यावरील कारंबा परिसरात सोमवारी सायंकाळी पाच वाजता संयुक्ताचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. तिच्या गणवेशावर डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयाचा लोगो असल्याने तिची तासाभरात ओळख पटली. संयुक्‍ता सोमवारी सकाळी सात वाजता कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती. सायंकाळी तिचा मृतदेह सापडला. ती बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. मंगळवारी दुपारी संयुक्ताचे शवविच्छेदन झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रथमेश कोठे आदींनी शासकीय रुग्णालयात येऊन भैरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. संयुक्ताचे वडील चाटी गल्लीत मुनीम आहेत, तर आई विडी कामगार आहे. 

गेल्या चार वर्षांपासून डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयात शिक्षण घेणारा सोमनाथ आणि संयुक्त हे दोघे एकाच वर्गात होते. दोघांची चांगली ओळख होती अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सोमनाथने सोमवारी सायंकाळी विजयपूर येथील गोलघुमटावरून उडी मारून आत्महत्या केली. संयुक्ता आणि सोमनाथची सोमवारी भेट झाली होती का, तिच्या मृत्यूनंतरच सोमनाथ विजयपूरला गेला का, दोघांत काही नाते होते का? याची चौकशी चालू असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली. मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात संयुक्ता आणि सोमनाथच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चौकशी चालू होती. 

तुळजापूर रस्त्यावर मोबाईल लोकेशन 
सोमवारी दुपारी तुळजापूर रस्त्यावर सोमनाथच्या मोबाईलचे लोकेशन असल्याचे तपासात समोर आले आहे. तो सोलापूरहून विजयपूरला दुचाकीवरून गेला का, हे शोधण्यासाठी विजयपूर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

संयुक्‍ता भैरी हिचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा अहवाल आला आहे. पुढील तपासाकरिता व्हिसेरा राखून ठेवला आहे. संयुक्ता आणि तिचा वर्गमित्र सोमनाथ या दोघांचा मृत्यू एकाच दिवशी झाला आहे. या घटनेत काही संबंध आहे का, याचा तपास चालू आहे. 
- विजय पाटील, पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com