कोल्हापूर पोलिसांनी केला टेंबलाईच्या नावाचा गजर

कोल्हापूर पोलिसांनी केला टेंबलाईच्या नावाचा गजर

कोल्हापूर - आषाढ सांगतेकडे निघाला असताना आता त्र्यंबोली यात्रेचा उत्साह टीपेला पोचला आहे. शहराच्या पेठापेठांतून आता यात्रांना उधाण आले असून, "टेंबलाईच्या नावानं चांगभलं' हा गजर घुमू लागला आहे.  "पी ढबाक' आणि पोलिस बॅंडच्या तालावर आज पोलिस आणि कुटुंबीयांनीही त्र्यंबोली देवीला पाणी वाहिले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक अशोक पोवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत पालखी आणि पाणीपूजन झाले. त्यानंतर पालखी पोलिस मुख्यालय वसाहतीतून त्र्यंबोली टेकडीकडे रवाना झाली. 

नेहमी थकलेल्या आणि गुन्हेगारी विश्‍वात गुरफटलेल्या विषयांतून थोडेसं बाहेर पडून पोलिसांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यात्रेच्या निमित्ताने आनंद सोहळाच साजरा केला. सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस वसाहतीतील त्र्यंबोली देवीच्या मंदिरासमोर "पी ढबाक'चा आवाज घुमू लागला. बघता बघता पोलिस वसाहतीतील पोलिस कुटुंबीय एकवटले आणि पालखी पूजनानंतर यात्रेला प्रारंभ झाला. प्रत्येकाच्या भाळी ल्यायलेला गुलाल आणि एकूणच सळसळत्या उत्साहात हा सोहळा सजला. दरम्यान, येथील पोलिस दलात त्र्यंबोली देवी ही शौर्याचे प्रतीक मानली जाते आणि त्याच श्रद्धेतून पूर्वापार चालत आलेली ही परंपरा बदलत्या काळातही जपली गेली आहे. 

लाईन बाजारचीही यात्रा... 
लाईन बाजार परिसरातही आज त्र्यंबोली यात्रा साजरी झाली. यानिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत ऋतूराज पाटील हे सुद्धा सहभागी झाले.  

दरम्यान, सायंकाळी पाचनंतर शहर आणि उपनगरातील विविध गल्ल्यांतून बहुतांश मिरवणूका टेंबलाई टेकडीकडे आल्या. दर्शनासाठीही मोठी गर्दी झाली. त्यामुळे चौकात वाहतूकीची कोंडी झाली. त्यातून वादावादीचे प्रकारही घडले. वाहतूक पोलिस या ठिकाणी हजर नसल्याने अखेर चांदणीनगर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी व रिक्षा व्यावसायिकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासांनी वाहतूक पोलिस या ठिकाणी आले. 

आषाढातील मंगळवार व शुक्रवारी शहरात त्र्यंबोली यात्रेची परंपरा आहे. यंदाच्या यात्रांनाही आता अंतिम टप्प्यात वेग आला असून, आज टेंबलाई टेकडी परिसर "पी ढबाक'सह पारंपरिक वाद्यांच्या निनादाने दुमदुमून गेला. शेवटच्या टप्प्यात आता सोशल मीडियावरही त्र्यंबोली यात्रेची धूम सुरू झाली आहे. यापूर्वीच्या यात्रांच्या सोहळ्यांचे फोटो व व्हिडिओ पुन्हा अपडेट होऊ लागले आहेत. "पुन्हा तोच दरारा', "तीस जुलैला थाट फक्त आमचाच', "परत तोच जल्लोष, तोच दरारा, फक्त बघायची त्र्यंबोली यात्रा' अशा प्रत्येक पेठेच्या टॅगलाईनही ठरल्या असून, त्यासुद्धा फोटोंच्या कोलाज आणि व्हिडिओबरोबर सर्वत्र शेअर होऊ लागल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com