Vidhansabha 2019 : युती तुटणे भाजपच्या पथ्यावर!

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात प्रबळ उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध करावी लागणार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काही मतदारसंघ वगळता शिवसेनेकडेही उमेदवार तयार आहेत. मागील निवडणुकांप्रमाणे या पक्षांना उमेदवारांची शोधशोध करावी लागेल, अशी परिस्थिती मात्र यावेळी नक्कीच नाही.

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या. चार वर्षे सत्तेत राहूनही दोन्ही पक्षांच्या एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरूच होत्या. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युतीचे गणित पुन्हा जुळले. तेव्हापासून विधानसभा निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील, अशीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची देहबोली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून युतीमध्ये पुन्हा ठिणगी पडेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातही तोच सूर दिसून येत होता. त्यामुळे युती पुन्हा तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास शिवसेनेपेक्षा भाजपकडे अधिक सक्षम उमेदवार असल्याचे दिसते. परंतु, शिवसेनाही भाजपचे स्वबळाच्या सत्तेचे मनसुबे रोखण्यासाठी सर्व मतदारसंघांत मागील निवडणुकीच्या तुलनेत चांगले उमेदवार उभे करू शकेल, अशी परिस्थिती आहे.

सातारा - शिवेंद्रराजेंचे भाजपपुराण खरे की खोटे?
सातारा मतदार-संघात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह-राजे भोसले भाजपमध्ये जातील, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्याला अजून तरी आमदारांकडून सूचक अशा कोणत्याच प्रतिक्रिया दिल्या गेल्या नाहीत. तसे झाले तर, या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलू शकतात. परंतु, सध्या तरी भाजपकडे दीपक पवार यांच्या रुपात चांगला पर्याय आहे. त्यांनी या मतदारसंघात कामही सुरू केले आहे. शिवसेनेकडे सध्या स्थानिक पातळीवर कार्यरत असलेला उमेदवारीचा चेहरा सध्या तरी दिसत नाही. परंतु, मागील निवडणुकीप्रमाणे माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांनाही मैदानात उतरवू शकते. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनाही ऐनवेळी निवडणुकीत उतरविण्याचा पर्याय शिवसेनेकडून काढला जावू शकतो.

कऱ्हाड उत्तर - मनोज घोरपडे की धैर्यशील कदम?
कऱ्हाड उत्तर मतदारसंघा-मध्ये भाजपचे मनोज घोरपडे यांनी आधीपासूनच प्रचाराला सुरवात केली. त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दौरेही या भागात झाले आहेत. मनोज घोरपडे यांच्याप्रमाणेच धैर्यशील कदम यांनाही चंद्रकांत पाटील यांनी चुचकारत ठेवले आहे. परंतु, धैर्यशील कदम यांचे शिवसेनेशीही संधान असल्याचे बोलले जाते. त्यामुळे युती तुटली तर, हे दोघे एकमेकांच्या विरोधात पुन्हा शड्डू ठोकू शकतात. त्याबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनाही सेनेकडून मैदानात उतरवले जावू शकते.

कऱ्हाड दक्षिण - माजी मुख्यमंत्र्यांना तोड देणारा हवा उमेदवार 
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात भाजपने राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपने या मतदारसंघात चांगली ताकद लावली होती. अतुल भोसले यांच्या रुपाने त्यांच्याकडे सक्षम पर्याय आहे. शिवसेनेचा विचार केल्यास सध्या तरी, अतुल भोसले व माजी मुख्यमंत्र्यांना तोड देईल, असा उमेदवार दिसत नाही. मागील वेळीही त्यांना अजिंक्‍य डी. वाय. पाटील या आयात उमेदवाराला तिकीट द्यावे लागले होते. परंतु, कऱ्हाड दक्षिणची आजवरची राजकीय मांडणी बदलणारी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ती म्हणजे उदयसिंह पाटील-उंडाळकर शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहणार याची. हे प्रत्यक्षात आले तर, कऱ्हाड दक्षिणची या वेळची निवडणूक वेगळ्याच पातळीवर लढली जाईल.

माण - भाजपचा उमेदवार मित्रपक्षाच्या चिन्हावर?
माण मतदारसंघाचे राजकीय वातावरण सध्या चांगले ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे भाजपची वाट चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांमुळे या मतदारसंघातील त्यांचे सर्वपक्षीय राजकीय विरोधक एकत्र आले आहेत. त्यामध्ये भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांचा समावेश आहे. युती तुटली तर, गोरेंना पाडण्याचा निर्धार पुरा करण्यासाठी हे नेते एकत्र राहणार का, पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे राहणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न असणार आहे. एकी तुटली तर, दोन्ही पक्षांकडेही उमेदवारांची कमतरता नाही आणि एकी राहिलीच तर, जयकुमार यांचे बंधू शेखर गोरे भाजप किंवा सेनेच्या तिकिटावर उभे राहू शकतात. ही जागा मित्रपक्षाकडे गेली तर, भाजपचाच उमेदवार मित्रपक्षाच्या चिन्हावर उभा राहू शकतो.

पाटण - शिवसेनेला नाही उमेदवारीची चिंता 
पाटण या एकमेव मतदार-संघात शिवसेनेचे पारडे जड आहे. शंभूराज देसाई हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे इथल्या उमेदवारीची सेनेला चिंता असणार नाही. भाजपलाच या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा, असा प्रश्‍न पडू शकतो. लोकसभेच्या तोंडावर सेनेत गेलेल्या नरेंद्र पाटलांची 
भाजपकडून पुन्हा घरवापसी होऊ शकते. अन्यथा भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर यांच्या उमेदवारीवर पक्षाला विचार करावा लागू शकतो.

वाई - भोसलेंना पक्षात घेऊन भाजपची बाजी
वाईमध्ये माजी आमदार व किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांना पक्षात घेऊन भाजपने आधीच बाजी मारली आहे. युतीचे मतदारसंघ जाहीर होण्यापूर्वीच प्रदेशाध्यक्षांनी मदन भोसलेंच्या प्रचारालाही सुरवात केली आहे. शिवसेना काय करणार, हे नेमके ठाऊक नसल्यामुळे त्यांच्याकडून इच्छुकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असतील असे पुरुषोत्तम जाधव सध्या शांतच दिसतात. परंतु, युती तुटल्यास शिवसेनेकडून त्यांना मैदानात उतरवले जावू शकते.

फलटण - भाजपकडून आगवणे प्रबळ दावेदार
फलटण-मध्येही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना खासदार करून भाजपने आपले पाय रोवले आहेत. युती तुटली तर, रणजितसिंहांचे समर्थक असलेले दिगंबर आगवणे हे भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असू शकतात. युती राहिली तरी, शिवसेनेकडून मैदानात उतरण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राखीव असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेकडे सध्या तरी, भक्कम असा स्थानिक उमेदवार समोर आलेला नाही. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे युतीचे नाते तुटल्यास त्यांना उमेदवार आयात करावा लागणार आहे.

कोरेगाव - सेना व भाजपमध्ये चुरस 
कोरेगाव मतदारसंघात शिवसेना व भाजपच्या इच्छुकांमध्ये चुरस आहे. भाजपचे महेश शिंदे यांनी मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. तर, शिवसेनेचे रणजितसिंह भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंची सभा घेऊन प्रचाराचे चांगले रान उठविले होते. या मतदारसंघात दोन्ही पक्षाला उमेदवारीची अडचण येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com