दुष्काळाबाबत सांगलीला सापत्न वागणूक : विश्‍वजित कदम

दुष्काळाबाबत सांगलीला सापत्न वागणूक : विश्‍वजित कदम

सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा आरोप आमदार विश्‍वजित कदम यांनी केला. त्याबाबत येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असा इशाराही 
त्यांनी दिला.

ते म्हणाले,‘‘आमदार शरद रणपिसे, रामहरी रुपन्नवार, विशाल पाटील अशा काँग्रेसच्या पथकाने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यात दौरा केला. शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळ निवारणात प्रचंड कमतरता जाणवल्या. प्रती जनावर ९० रुपये अनुदान २०१२ मध्ये दिले जात होते. आज एवढी महागाई वाढली असताना अनुदान मात्र तेवढेच आहे. सगळ्यात अन्यायकारक गोष्ट म्हणजे चारा छावण्यासांठी पाच लाख रुपये अनामत रक्‍कम या जिल्ह्यासाठी आहे. हीच मर्यादा सोलापूर जिल्ह्यात फक्‍त एक लाख रुपये आहे. 

या दुजाभावामुळे चारा छावण्या चालविण्यासाठी फार संस्था उत्सुक नाहीत. महागलेला चारा, अन्य खर्च पाहता एका जनावरामागे १२० रुपये तरी दिले पाहिजेत. लहान जनावरांना नऊ आणि मोठ्यांना अठरा किलो चारा दिला जातो. त्यात वाढ केली पाहिजे. जनावरे मोजण्याची पद्धतीही चुकीची आहे. सकाळी एकदाच मोजली जातात, त्यानंतर आलेल्या जनावरांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे संख्या सायंकाळी सहा वाजता गणना करावी.’’ 

ते म्हणाले,‘‘एका शेतकऱ्याची पाचच जनावरे छावणीत घेण्याची अट अन्यायकारक आहे. एखाद्याकडे सहा जनावरे असतील तर त्या एकट्याची वेगळी व्यवस्था करण्याची वेळ येते. रोजगार हमीची कामेसुद्धा छावण्यांच्या परिसरातच केल्यास शेतकऱ्यांची व्यवस्था होईल. टॅंकरची संख्या अत्यंत कमी आहेत. पतंगराव कदम पालकमंत्री असताना त्यांनी मागेल त्या गावाला टॅंकर दिला होता. याबाबत निर्णयाचे अधिकार तहसीलदारांना दिले होते. येथील सत्ताधारी आमदारांचा सरकारमध्ये प्रभाव नाही. ते सोयी सुविधा आणू शकत नाही. मी स्वत: विधानसभेत यावर बोलणार आहे. मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटून हे सर्व मुद्दे त्यांच्या कानावर घातले आहेत. त्यांनी यामध्ये लक्ष घालीन, असे आश्‍वासन दिले होते.’’

बारा संपर्क केंद्रे
पलूस-कडेगाव मतदारसंघात १२ ठिकाणी संपर्क केंद्रे सुरू केल्याचे सांगून ते म्हणाले,‘‘पतंगराव कदम यांच्या पश्‍चात मी विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही.  प्रलंबित फायली पूर्णत्वाला नेल्या आहेत. सत्ता नसताना विकासकामांना गती दिली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com