महाराष्ट्र सदैव सीमावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे 

nipani
nipani

निपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66 वर्षापासून सनदशीरमार्गाने लढा देत आहेत. तरीही कर्नाटक शासन त्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय करत आहे. तो दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी बाधवांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या महापौर सरीता मोरे यांनी केले. 

येथील साखरवाडीतील कार्यक्रमात हुतात्मा कमळाबाई मोहिते, बारवाड येथील गोपाळ चौगुले यांना गुुरुवारी (ता. 17) अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद होते. 

जयराम मिरजकर म्हणाले,"संघटीतपणाच्या जोरावर सीमालढा अंतिम टप्प्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विविध बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा सुरु आहे. आता सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्‍न असून सीमाप्रश्‍नाचे समन्वयक कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आहे. त्यामुळे लवकरच सीमाप्रश्‍न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी सर्वांनी अंतिम लढ्यात सहभाग घेऊन तो यशस्वी करावा." 
प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले,"सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला सीमाप्रश्‍न हा जगातील मोठा लढा आहे. महाराष्ट्राने योग्य भूमिका घेतली आहे. मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन या लढ्यात सहभागी झाले पाहिजे.' नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी, हुतात्मा कमळाबाई मोहिते यांची मुलगी रंजना कणसी यांना घरकुलासाठी नगरपालिकतर्फे जागा दिली आहे. घरकुल बांधणीसाठी नगरपालिकेतर्फे आर्थिक तरतूद व स्मारकासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

बेळगाव नाक्‍यावरही बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब खांबे, नगरसेवक रवींद्र शिंदे, दत्ता नाईक, अनिस मुल्ला, डॉ. जसराज गिरे, गणी पटेल, विठ्ठल वाघमोडे, नंदकुमार कांबळे, संजय चोरगे, विजय शेटके, सुभाष खाडे, उदय शिंदे, अस्लम शिकलगार, राजू निकम, रमेश निकम, प्रताप पाटील, प्रा. भारत पाटील, रवी कोरगावकर, बाळू हजारे, संदेश कुंभार, सचिन पोवार यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते. हरीष तारळे यांनी सूत्रसंचालन केले. 

लवकरच मराठी भाषिकांना न्याय मिळेल 
महापौर सरीता मोरे म्हणाल्या,"सुरुवातीपासूनच मराठी बांधवावरील अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्राने ठाम भूमिका घेतली आहे. प्रत्येकवेळी मराठी माणसांच्या हक्कासाठी कोल्हापूरकर एकवटतात. या भागातील मराठी बांधवावर पोलिसांची मोठी दहशत असून त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. शासकीय कामातही अनेक अडचणी येत आहेत. त्याविरोधात चळवळी आणखी तीव्र करण्याची गरज आहे. आता सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात असून लवकरच मराठी भाषिकांना न्याय मिळेल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com