#BappaMorya ढोल-ताशांचा ज्वर

Dhol-Tasha
Dhol-Tasha

आषाढातील वारीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले, की पुण्यनगरीला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या वातावरणात सुरवात होते ती ढोल-ताशा वादनाच्या सरावाची. पुण्यात नदीकाठी, नेहरू स्टेडियमच्या आजूबाजूला, मार्केट यार्ड परिसरात ढोल-ताशांचे आवाज घुमायला लागतात आणि त्या आवाजाच्या ओढीने तरुणाई येथे हजेरी लावते. हळूहळू कट्ट्यांवर चर्चा रंगायला लागते ती पथकांच्या सरावाची. कोणते पथक भारी आहे.... कोण चांगला ताशा वाजवतो.... तो अमुक-अमुक ढोल काय छान उडवतो... येथून सुरू झालेल्या चर्चेचा शेवट होतो तो अमुक एक पथकात कोणाच्या ओळखीने आपल्याला प्रवेश मिळू शकेल? या प्रश्‍नाने. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, आयटीयन्स यांना जणू ढोल-ताशांचा ज्वर चढायला लागतो. कोणत्याही द्रव्याचे सेवन न करता चढणारी ही संगीताची झिंग मग संपूर्ण पुण्याला झपाटून टाकते. पूर्वी म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाकडे जाणारा डीपी रस्ता वादन सरावाचा केंद्रबिंदू होता. शिवगर्जना या पहिल्या बिगर शालेय पथकाला सरावासाठी जागा दिली ती कृष्णसुंदर गार्डनच्या सुरेशकाका गायकवाड, अमित गायकवाड यांनी. यानंतर डीपी रोड या पथकांनी व्यापला. सध्या इथला सराव काही कारणांनी थांबला आहे. आता मुठा नदीकाठी बऱ्याच पथकांचा सराव चालतो. सुरवातीच्या काळात या पथकांमध्ये प्रवेश देण्याबाबतचे फलक दिसू लागतात. मुला-मुलींची झुंबड उडते ती आवडत्या पथकात प्रवेश घेण्यासाठी. काही पथकांमध्ये फक्त ढोल-ताशांचे वादन असते, तर काही पथकांमध्ये ढोल-ताशांच्या तालावर बरची (टिपरी), लेझीम, ध्वज, झांजा, टाळ, मर्दानी खेळ अशा शालेय मुलांच्या नृत्यप्रकारांचाही समावेश असतो. 

पथकांमध्ये येणाऱ्या वादकांची माहिती एका फॉर्ममध्ये रक्तगट, जन्मतारखेसह नोंदवली जाते. या वादकांना ओळखपत्र दिले जाते. या पथकांचा गणवेश म्हणजे त्या-त्या पथकाची जणू ओळखच. पांढऱ्या शुभ्र सलवार कुडत्यासह फेटे, भगव्या टोप्या, शेले, गळ्यातल्या माळा, कडी, विविधरंगी जाकिटे यांनी या पथकांना वेगळीच शोभा येते. याव्यतिरिक्त ढोलांना झालरी, ध्वजाला चकचकीत कळस या गोष्टीही पथकांची शोभा वाढवणाऱ्या ठरतात. मध्यंतरी एका पथकाने ध्वजाच्या कळसाला सोन्याचे पॉलिश दिल्याचेही समजले होते. मुला-मुलींना वादन-नृत्याच्या वेळी त्रास होऊ नये, म्हणून स्पोटर्स शूज, आधुनिकपणा आणण्यासाठी गॉगल, परंपरा जपण्यासाठी महिलांसाठी नऊवारी साडी, नाकात नथ असा बहुढंगी सरंजाम पथकांमध्ये आढळतो. त्यातून तयार होतो ते एक निराळाच माहोल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com