पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणी

Village
Village

पिंपरी - जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित आहेत. याशिवाय अन्य ३५ गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आहे. या निकृष्ट पावडरमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण २० टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी व टीसीएल पावडरच्या नमुने तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे.

दूषित पाणी पित असलेली सर्वाधिक २१ गावे शिरूर व जुन्नर तालुक्‍यात आढळून आली असून, खेड व वेल्हे या दोन तालुक्‍यांमधील एकाही गावात पिण्याचे पाणी दूषित आढळलेले नाही. आरोग्य विभागाच्या वतीने दरमहा पिण्याचे पाणी व टीसीएल पावडरच्या दर्जाची तपासणी करण्यात येते. शिवाय, दूषित पाणी आढळून आलेल्या गावांमधील पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजनाबाबत सूचना देण्यात येतात. यामुळे केवळ अशुद्ध पाण्यामुळे उद्‌भवणाऱ्या संभाव्य आजारांना आळा घालणे सोपे होते. 

आरोग्य विभागाने जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांमधील गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील २ हजार ५१० पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी ११५ गावांमधील पाणी दूषित असल्याचे, तर ३५ गावांमध्ये टीसीएल पावडर निकृष्ट असल्याचे दिसून आले. निकृष्ट पावडर आढळून आलेल्या गावांची यादी पुढीलप्रमाणे ः मांदळवाडी, अवसरी बुद्रुक, तळेकरवाडी, गंगापुर बुद्रुक, अमोंडी, वडगाव, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, ठाकरवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, पिंपळगाव व कळंब (सर्व ता. आंबेगाव).  सुपा, कुतवळवाडी, खराडेवाडी, कोळोली, तरडोली, बाबुर्डी, काळखैरेवाडी, सोनवडी, सुपे, आंबी बुद्रुक, पानसरेवाडी, भिकोबानगर, धुमाळवाडी (सर्व ता. बारामती). आंबोली, चिल्हेवाडी, धामणखेल, धालेवाडी (सर्व ता. जुन्नर) आणि पिंपरी बुद्रुक, कोहीनकरवाडी, वाडा, बिवी आणि तिफनवाडी (सर्व ता. खेड).

टीसीएल पावडरमध्ये किमान ३३ टक्के क्‍लोरीन असणे अनिवार्य असते. त्यापेक्षा कमी आढळल्यास, ती पावडर फेकून देऊन, नवीन दर्जेदार पावडर खेरदी करण्याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीला केल्या जातात. 
- डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com