चांदणी चौकाच्या पुलासाठी राज्याकडून १८५ कोटी

चांदणी चौकाच्या पुलासाठी राज्याकडून १८५ कोटी

पुणे - भूमिपूजन होऊन एक वर्ष उलटल्यानंतरही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार कान टोचूनही चांदणी चौक उड्डाण पुलासाठी भूसंपादनास अपयशी ठरलेल्या पुणे महापालिकेच्या मदतीला राज्य सरकार धावून आले आहे. या पुलाच्या कामासाठी भूसंपादनासाठी लागणारा १८५ कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. ३०) मान्यता दिल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी  यांनी दिली.

मागील वर्षी २७ ऑगस्ट रोजी चांदणी चौकाच्या उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले होते. या वेळी केंद्र सरकारकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी पुणे महापालिकेने भूसंपादन करणे अपेक्षित होते. परंतु वर्ष होऊनही याला गती आली नव्हती. जागा ताब्यात नसल्याने कामही सुरू करता येत नव्हते. 

पुणे महापालिकेने भूसंपादनाच्या निधीबाबत असमर्थता दाखवल्याने राज्य सरकारकडून निधी मिळविण्यावाचून पर्याय नव्हता. हे काम थांबल्याने पुणे भेटीवर अनेकदा आलेल्या गडकरी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला हे काम मार्गी लावण्यात अपयश आले होते. त्यामुळे या कामासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, यासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या निधीमुळे पुलाचे काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

सर्वसाधारणपणे ‘ड’ वर्ग महापालिकांना राज्याकडून निधी दिला जातो. त्या यादीत पुणे महापालिका नसतानाही राज्य सरकारने हा निधी दिला. तसेच नगरविकास खात्याने एकूण मागणीच्या ५० टक्के निधी द्यावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. पुणेकरांच्या दृष्टीने असलेले विषयाचे गांभीर्य, महापालिकेला असलेली निधीची अडचण याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी आज शंभर टक्के निधी मंजूर केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
- मेधा कुलकर्णी, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com