बारामतीत भाजप लढणारच; पण उमेदवारच सापडेना..!

Baramati
Baramati

मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसभेच्या ज्या मोजक्‍या मतदारसंघांकडे देशाचे लक्ष असते, त्यात बारामतीचा समावेश नेहमीच होतो. प्रारंभी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आता त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ म्हणून तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आघाडीची मोट बांधण्यात शरद पवार यांचा पुढाकार आहे. दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे बारामतीकडे देशाचे लक्ष राहणार, यात शंका नाही.

या मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला, तर १९८४,  १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ असे सलग सहावेळा शरद पवार; तर २००९ आणि २०१४ मध्ये सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून गेल्या. मताधिक्‍यामध्ये झालेले चढउतार वगळता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सातत्याने विजयी होत आले आहेत. देशात अनेक पक्षांच्या, नेत्यांच्या लाटा आल्या गेल्या; मात्र बारामतीवरील पवार कुटुंबीयांची पकड कायम आहे.

महादेव जानकर यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या ‘कपबशी’ चिन्हावर निवडणूक लढवत सुळे यांना चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. या वेळी ते पुन्हा येथे लढतील किंवा कसे, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ‘कमळ’ चिन्हावर बारामतीची जागा लढवून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केल्याने जानकरांची पंचाईत झाली आहे. 

गेल्या निवडणुकीच्या वेळी धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाची धग तीव्र होती. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. यंदा स्थिती वेगळी आहे. गेल्या पराभवानंतर जानकरांनी राज्याच्या राजकारणात स्थिरावत मंत्रिपद मिळवले. त्यांचा या मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी फारकत घेतली आहे.

दुसरीकडे सुळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संसदेत कायम सक्रिय असतात. त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच विरोधकांशीही वैयक्तिक पातळीवर उत्तम संबंध राखत मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली आहेत. राष्ट्रवादीकडून सुळे उमेदवार असतील, हे स्पष्ट असल्याने त्यांचे काम जोमाने सुरू आहे. त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार, हे तूर्त निश्‍चित झालेले नाही. ते जाहीर झाल्यावर, संबंधित उमेदवाराला हाती असलेल्या मर्यादित कालावधीत मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोचण्याचे आव्हान पेलावे लागेल.

२०१४ चे मतविभाजन
    सुप्रिया सुळे - (राष्ट्रवादी काँग्रेस) ५,२१,५६२ (विजयी)
    महादेव जानकर - (राष्ट्रीय समाज पक्ष) ४,५१,८४३
    सुरेश खोपडे - (आप) २६,३९६
    काळूराम चौधरी - (बहुजन समाज पक्ष) ः २४,९०८

निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे
    खासदारांचा मतदारसंघात नियमित संपर्क, केलेली विकासकामे
    शेतकऱ्यांची बाजू दिल्लीत मांडण्यासाठी योग्य उमेदवार
    युवकांना रोजगार प्राप्तीसाठी मदत करणारा उमेदवार
    समाजाच्या सर्व घटकांशी नियमित संपर्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com