शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

pune
pune

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील. शेतकरी उत्पादक संस्थे सारख्या शेतकऱ्यांसाठी पुरक संस्थेच्या प्रोत्साहन व मदतीसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी तयार आहे. परंतु या शेतकरी उत्पादक संस्थेत केवळ खरे शेतकरीच हवेत व त्यांनाच या योजनेचा फायदा मिळावा" असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केले.

विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने 'अद्ययावत, स्पर्धात्मक व मजबूत शेतकरी उत्पादक संस्था' याविषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निती आयोगाचे सदस्य प्रा.रमेश चंद, अहमदाबादच्या आयआयएम संस्थेचे प्राध्यापक डॉ.सुखपाल सिंह, वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ.के.के.त्रिपाठी, निवृत्त सनदी अधिकारी डॉ.सुधीरकुमार गोयल, राज्याचे कृषी आयुक्त एस.पी.सींग इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलतांना राज्यमंत्री रुपाला म्हणाले "शेतक-यांच्या उत्पादनाला योग्य तो दर मिळायलाच हवा तो मिळवण्यासाठी शेतीमालाचा दर्जेदार पुरवठा झाला तर नक्कीच दरही मिळेल. परंतु यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

जागतिक पातळीवरील कृषी मालाच्या विक्रीतील संभाव्य धोके, समस्या व संधी याचाही उत्पादक शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. केवळ माल उत्पादन करुन चालत नाही तर त्यासाठी योग्य ती बाजारापेठ शोधून ग्राहकांपर्यंत पोहचणे व त्याचा फायदा घेणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था महत्वाची ठरणार आहे. या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांच्या उत्पादनानंतरच्या समस्या सोडवणे, उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारणे यासाठी व्हावा. तसेच असे मॉडेल संपुर्ण देशभरात विकसित करायला हवे ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढून ते समृध्द होतील " असेही ते म्हणाले.

यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ.सुधीर गोयल म्हणाले "शेतकरी जेव्हा माल बाजारात आणतो त्यावेळी खरेदीदारांचा ओढा हा व्यापारी, दलाल यांच्याकडून खरेदी करण्यातच असतो.परंतु सर्वांनी थेट शेतकरी समुहांकडून माल खरेदी केला तर शेतकऱ्यांना याचा फायदा तर होईलच पण आपल्यालाही ताजा माल मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता थेट शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी करावा." याप्रसंगी निती आयोगाचे सदस्य प्रा.रमेश चंद, डॉ.के.के.त्रिपाठी, डॉ.सुखपाल सिंह यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला देशभरातून जवळपास चारशे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यशाळेची उद्दीष्ट्ये :
- आव्हाने शोधून शेतकरी उत्पादक संस्थेच्या शाश्वत विकासासाठी उपाययोजना आखणे.
- शेतकरी उत्पादक संस्थेच्या क्षमता व गरजा ओळखणे.
- शेतकरी उत्पादक संस्था व सहकारी संघातील यशापयशातील अनुभव व आदानप्रदानातून शिकणे.
- स्वनियोजनातील आव्हाने व प्रभावशाली शासन याचा अभ्यास.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com