#GyanGanesh "बाईक ऍम्ब्युलन्स'द्वारे दीड हजार जणांना जीवदान 

#GyanGanesh "बाईक ऍम्ब्युलन्स'द्वारे दीड हजार जणांना जीवदान 

पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन वर्षांपूर्वी टिळक रस्त्यावर अचानक गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण किरकोळ जखमी झाले, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याबाबत "कॉल' होता. सर्वच रस्त्यांवर प्रचंड गर्दी. पाय ठेवायलाही जागा नव्हती, तरीही घटनास्थळी "बाईक ऍम्ब्युलन्स' पोचली. डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार केले आणि संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवणं गरजेचं होते. "बाईक ऍम्ब्युलन्स'ने गर्दीतून वाट काढत जेमतेम पाच मिनिटांत तिला पूना हॉस्पिटलमध्ये नेलं...या महिलेचे प्राण वाचू शकले, ते "बाइक ऍम्ब्युलन्स'मुळे. 

वाहतूक आणि वाहनांबाबतच्या नियमांची अंमलबजावणी, बेशिस्त वाहनांवरील कारवाई आणि काही ना काही कामे घेऊन येणाऱ्या लोकांच्या गराड्यात अनिल वळीव यांचा दिवस कधी संपतो, हे त्यांनाही कळत नाही. अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेल्याचं वळीव यांनी पाहिलंय. जखमींना वेळेत उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, हे त्यांनी जाणलं. मग अपघातातील जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात हलविण्यासाठी वळीव यांनी एक भन्नाट कल्पना शोधली. मित्रांपुढे मांडली अन्‌ बघता बघता काही दिवसांमध्येच त्या कल्पनेतील "बाईक ऍम्ब्युलन्स' रस्त्यावर धावू लागली. 

अशा ऍम्ब्यलुन्सची संख्या आता 50 इतकी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीसह उत्सवाच्या काळात ही ऍम्ब्युलन्स अगदी गल्लीबोळांतूनही धावते आणि या उपक्रमातून आतापर्यंत दीड हजार लोकांना मदत केल्याचा आकडा आहे. या योजनेची तत्पर सेवा आणि व्यापकता लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेनेही त्याची दखल घेतली असून, एकत्रित काम करण्यासाठी "बाइक ऍम्ब्युलन्स'साठी हात पुढे केला आहे. 

प्रादेशिक परिवहन विभागात 1998 मध्ये वळीव हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झाले. राज्यातील वेगवेगळ्या भागांत त्यांनी काम केले. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यांनी 2013 मध्ये ही योजना सुरू केली. विशेषतः गणेशोत्सवात "बाईक ऍम्ब्युलन्स'ला मागणी वाढली. माळीणच्या घटनेतही बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून मदत करण्यात आली. 

वळीव म्हणाले, ""रस्ते अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी चारचाकी रुग्णवाहिका पोचण्यात अडचणी येतात. बाईक ऍम्ब्युलन्समुळे काही वेळा जखमींना वेळेत उपचार मिळतात. या पार्श्‍वभूमीवर बाईक ऍम्ब्युलन्सची कल्पना आणली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिची उपयुक्ताही दिसून आली. वेगवेगळ्या घटनेतील 15 हजार लोकांना तिचा फायदा झाला आहे. या योजनेचा विस्तार करायचे नियोजन आहे.'' 

अशी आहे बाइक ऍम्ब्युलन्स 
प्राथमिक उपचाराचीही सोय 
डॉक्‍टर उपलब्ध 
परिसरातील रुग्णालयांशी संपर्क यंत्रणा 

यातून आपण काय घेणार? 
- समाजासाठी खरंच काही करायचं असेल, तर त्यासाठी इतरांची वाट बघण्याची गरज नाही 
- समोरच्या समस्येवर चर्चा करत बसण्यापेक्षा, त्यावर तोडगा शोधून काढला, तर ते जास्त उपयुक्त आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com