'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'

bjp
bjp

पुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी खासदार अनिल शिरोळे यांचे कौतुक केले. खासदार काकडे यांनी शिरोळे यांच्याबाबत केलेल्या मितभाषी या उल्लेखाचा धागा बापट यांनी पकडला आणि तुम्ही कमी बोला, म्हणजे शिरोळे बोलतील, असा सल्लाही काकडे यांना दिला. एवढेच काय, शिरोळे बोलण्यात कमी पडले तर उरलंसुरलं आम्हीही बोलू, अशी उपरोधिक कोपरखळीही बापट यांनी या वेळी मारली आणि सभागृहात एकच हशा पिकला. 

निमित्त होते, खासदार शिरोळे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन समारंभाचे. या समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून हजेरी लावली, तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत गुंतले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट जाहीर भाषणात, तर जावडेकर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शिरोळे यांच्या स्वभावाचे व त्यांच्या कामांच्या पद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. 

पालकमंत्री बापट आणि खासदार काकडे यांच्यातील वैचारिक आणि पक्षांतर्गत मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यातच काकडे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी काकडे यांच्याबाबत केलेली कोटी ही वरून सल्ला वाटत असली, तरी ती त्यांच्यासाठी कोपरखळीच ठरली. शिरोळे म्हणजे सच्चा व प्रामाणिक माणूस, लोकसभेत सर्वाधिक वेळ देणारा खासदार आणि काम मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणारा कार्यकर्ता अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिरोळे यांचे कौतुक केले. शिरोळे हे संसदेची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आधी लोकसभेत पोचतात आणि संध्याकाळीही सर्वांत शेवटी म्हणजे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनंतर लोकसभेतून बाहेर पडतात. एवढा वेळ देणारा दुसरा एकही खासदार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिरोळे हे 70 च्या दशकापासून सच्चा व प्रामाणिक मित्र असल्याचे जावडेकर म्हणाले. शिरोळे म्हणजे मितभाषी व कामात पक्का असणारा खासदार असल्याचा उल्लेख काकडे यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com