काँग्रेसमध्ये षटकार कोण मारणार?

Congress
Congress

आघाडीच्या राजकारणात ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी मित्र पक्षाच्या जागेवर हक्क सांगण्याची तशी परंपराच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या लोकसभा जागावाटपातही राज्यातील आठ मतदारसंघांसाठी हे बार्गेनिंग ‘सूत्र’ दोन्ही पक्षांकडून वापरले जात आहे. पुण्याच्या जागेबाबत या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस कधी नव्हे इतकी आक्रमक होती. पण, तरीही जागा काँग्रेसकडेच राहील, यात फारशी शंका उरलेली नाही. आता खरी कसोटी काँग्रेसची लागणार असून, तगडा उमेदवार शोधण्यापासून दोन्ही काँग्रेसमधील समन्वयापर्यंत पक्षाला मजबूत पायाभरणी करावी लागणार आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेशच्या विजयाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना आगामी लोकसभा लढण्यासाठी ‘हत्ती’चे बळ मिळाले आहे. महाराष्ट्रात गेली साडेचार वर्षे सत्तेबाहेर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘सत्तेशिवाय शहाणपण नसते,’ हे मनोमन पटले आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून सत्तेचे शहाणपण मिळविण्यासाठी आतुर असणारे हे दोन्ही पक्ष आघाडीसाठी कमालीचे उत्सुक आहेत. त्यामुळेच फारशी घासाघीस न होता लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात पोचली आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यात काँग्रेसला २५, तर राष्ट्रवादीला २३ असे जागांचे सूत्रही जवळपास मान्य झाले आहे. यवतमाळ, वाशीम, कोल्हापूर आदी आठ जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला असून, यातील काही जागा केवळ ‘बार्गेनिंग’साठीच आहेत, हे दोन्ही पक्षांतील नेते मान्य करतात. पुणे हेही त्यापैकी एक. 

पुणे जिल्ह्यातील चार जागांपैकी पुण्याची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. या जागेवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दावा केला होता. अर्थात, त्यामागचं कारण नगर, कोल्हापूर, नंदुरबार या जागांमध्ये लपलेले आहे. पण, दिल्लीतील बैठकीत पुण्याच्या जागेवर काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीची डाळ शिजू न देता पुणे आपल्याकडेच राखण्यात यश आले, पण आता ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे. 

लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर आतापर्यंत काँग्रेसच्या मतांचा तीन-सव्वातीन लाखांचा पाया कधीही हलला नाही. पण, या पायावर कधी काळी रचलेले इमले सध्या ढासळले आहेत. गेल्या लोकसभा, विधानसभा आणि वर्ष-दीड वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली. त्यामुळे जागा तर मिळाली; पण काँग्रेसकडे उमेदवार कोण?, असा प्रश्‍न पहिल्या दिवसापासून विचारला जात आहे.

काँग्रेसकडे सध्या जी नावे चर्चेत आहेत, त्यांना विजयापर्यंत पोचण्यासाठी कमकुवत पक्षसंघटना, नव्या कार्यकर्त्यांची वानवा अशा अडचणींचा डोंगर पार करावा लागणार आहे. 

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा करिष्मा ही सध्याच्या काँग्रेसची जमेची बाजू आहे. पण, पुण्यात विजयश्री खेचण्यासाठी केवळ हा करिष्मा उपयुक्त ठरणार नाही. त्यासाठी भाजपशी चार हात करणारी सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल. शहर काँग्रेसच्या वतीने सध्या सरकारविरोधात जवळपास दररोज आंदोलने करण्यात येत आहेत. काही आंदोलने राष्ट्रवादीला सोबत घेऊन होत आहेत. मात्र, आंदोलन करणारे चेहरे सर्वसमावेशक असतील, तर पक्ष बदलतोय, याची जाणीव सुज्ञ पुणेकरांना होईल. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाला लवकरात लवकर उमेदवार निश्‍चित करावा लागेल. पक्षाच्या कार्यकर्त्यांना किमान ‘आयात उमेदवार येणार नाही, तुमच्यातीलच कोणीतरी असेल,’ याची खात्री द्यावी लागेल. राजस्थान-मध्य प्रदेशातील विजयाच्या उसन्या अवसानावर पुण्याची जागा जिंकता येणार नाही, याचे भान बाळगावे लागेल. विजयासाठी मतदारांच्या खऱ्या प्रश्‍नांना हात तर घालावा लागेलच, पण नव्या मतदाराला काँग्रेस जवळचा वाटेल, असे मुद्दे घेऊन मैदानावर उतरावे लागेल. 

सध्या तरी मैदान आहे, खेळाडू आहे; पण उमेदवारीचा षटकार कोण मारणार?, याचीच उत्सुकता असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com