सरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)

saswad.jpg
saswad.jpg

सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब माणसाला गाजर दाखवून फसवितात. त्यामुळे त्यांचा घडा भरत आला आहे,'' असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिला. 

पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज (ता. 16) सासवड येथील पालखी मैदान क्रमांक दोनवर शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हरीश सणस, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जालिंदर कामठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, प्रवक्ते विजय कोलते, सुदाम इंगळे, दिगंबर दुर्गाडे, रमेश थोरात, सुरेश घुले, सचिन घुले, राहुल गिरमे, पुष्कराज जाधव, गौरी कुंजीर, जगन्नाथ शेवाळे, बबन टकले आदी या वेळी उपस्थित होते. जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले. 
पवार म्हणाले, ""राष्ट्राची भूक भागविणारा शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशाचे पंतप्रधान विरोधकांवर परदेशात जाऊन बोलतात. नोटाबंदीने आर्थिक व्यवस्था कोलमडली. पीकविम्यात शेतकरी नाही, तर खासगी कंपन्याच जोगवतायेत. निवडणूक जुमला म्हणून मोदींच्या थापांना अमित शहा वाचवितात. पंतप्रधान राष्ट्राचा नव्हे; तर पक्षाचा झाला आहे.'' 

या वेळी तालुकाध्यक्ष झेंडे यांनी, तालुका संपूर्ण दुष्काळी म्हणून जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, तरुणांना रोजगार द्या, शेतीमालास हमीभाव द्या, असे ठराव मांडले. ते शेतकऱ्यांनी संमत केले. या वेळी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जयंत पाटील यांनी स्वागत केले. 

"शिव्या देण्यापेक्षा संधीचे सोने करा' 
राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले, ""पुरंदरच्या लोकप्रतिनिधींना सोन्यासारखी संधी मिळाली. त्यांनी संधीचे सोने करावे. सोन्यासारखे राहावे. उगीच आम्हाला शिव्या देऊ नयेत. चौकट सोडून वागले, तर इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता, हे लक्षात ठेवावे. वाढप्याने अन्‌ आचाऱ्याने गावजेवणात उगीचच "जेवण कसे मी दिले?' असे म्हणून मिरवू नये.'' तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे उपस्थित नव्हते. यावर ""एक गडी दिसत नाही. आता नांदायचं नसेल तर काय करणार?'' असा टोला पवार यांनी लगावला. 

विमानतळप्रश्‍नी शेतकऱ्यांच्या बाजूने : सुळे 
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ""पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाप्रमाणेच बारामती मतदारसंघात मला वयोश्री योजनेत काम करता आले. त्याशिवाय सायकलवाटप, यूथ फेस्टिव्हल, आरोग्य शिबारे यातही आघाडीवर आहे. संसदरत्न पुरस्कार मला बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मिळाला. नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देणार नाही.'' तसेच शरद पवार यांनीही, शेतकऱ्यांना विमानतळप्रश्‍नी काय देताय, ते पाहू; अन्यथा साथ देणार नाही, असे स्पष्ट केले. 

"गुंजवणी'ला तरतूदच नाही : झेंडे 
"गुंजवणी धरण्याच्या पाइपलाइनला 1,313 कोटींचा निधी मिळाला. मात्र ही तरतूद बजेटमध्ये नाही. केवळ 50 कोटींचाच निधी वर्ग आहे. हे मी माझ्या हातात असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्याने सांगतोय,'' असे संभाजी झेंडे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com