गोळीबारप्रकरणी सराईत गुन्हेगार अटक

Crime
Crime

पुणे - शुक्रवार पेठेत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात नऊ दिवसांपासून फरारी असलेला सराईत गुन्हेगार नयन मोहोळसह तिघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

नयन भाऊसाहेब मोहोळ (वय २८, रा. हमालनगर, जुनी चाळ, मार्केट यार्ड), त्याचा साथीदार निखिल मुकुंद बाबर (वय २४, रा. बिल्डिंग क्र. ३, रूम क्र. १५) आणि शुभम गोरख बाबर (वय २३, रा. बिल्डिंग क्र. ५, रूम क्र. १५, हमालनगर, मार्केट यार्ड) यांना खुनाच्या प्रयत्नावरून अटक झाली आहे. शुक्रवार पेठेत ३१ ऑक्‍टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून त्यांनी मंदार धुमाळ, गणेश दारवटकर, मंगेश धुमाळ यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि त्याचे दोन्ही साथीदार खडकवासला भागात लपल्याची माहिती पोलिस कर्मचारी राकेश क्षीरसागर यांना समजली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक वैभव पवार आदींच्या पथकाने त्यांना ८ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वी लुकमान नदाफ, स्वप्नील दाते, जितेंद्र आनंद सोनवणे यांना अटक झाली असून, त्यांनाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक 
दिवाळी पाडव्याच्या दिवशी पहाटे दोन वाजता मुंढव्यातील पिंगळे वस्तीत एचडीएफसी बॅंकेचे एटीएम फोडण्याच्या आरोपावरून तीन युवकांना पोलिसांनी अटक केली. दोन जागरूक नागरिकांमुळे हे चोरटे पोलिसांच्या ताब्यात आले.

प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) व भरत प्रतापराम ईरागर (वय १९, तिघेही रा. बालाजी सुपर शॉपी मागे, तुपे कॉर्नर, हडपसर) यांना अटक झाली आहे. तिघेही मूळचे राजस्थानचे आहेत. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पिंगळे वस्तीत गंगा ऑर्चिड सोसायटीजवळ एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमची दोन-तीन जण तोडफोड करीत आहे, अशी माहिती परिसरातील दोन रहिवाशांनी पोलिसांना कळविली. त्यानुसार गस्तीवरील पोलिस शिपाई बालाजी काटे, नाईक आढारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही युवकांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एटीएमचे उपकरण फोडत असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे सहायक निरीक्षक पी. एच. रेजितवाड यांनी त्यांना अटक केली. मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमित वाळके तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com