CyberSecurity
CyberSecurity

#CyberSecurity हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर आता कोण ?

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘एटीएम स्विच’ सर्व्हरवर हल्ला करून हॅकर्सने तब्बल ९४.४२ कोटी रुपये लुटल्यानंतर सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सर्वच वित्तीय संस्थांचे धाबे दणाणले आहे. या ‘सायबर फ्रॉड’चे स्वरूप लक्षात घेता भविष्यात सहकारी बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय संस्था हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर असतील.

या वर्षीच ‘सिटी युनियन’ बॅंकेवर मोठा मालवेअर हल्ला झाला होता. त्यानंतर दुसरा हल्ला कॉसमॉसवर झाला. बॅंकांच्या सायबर सुरक्षा यंत्रणेवर असंख्य ‘सायलेंट मालवेअर ॲटॅक’ होत असतात; पण राष्ट्रीयीकृत बॅंकांची सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याने ते हल्ले निष्प्रभ ठरतात. पण अनेक सहकारी बॅंका, पतसंस्था, लहान वित्तीय संस्थांची सायबर सुरक्षा यंत्रणा त्या तुलनेत भक्कम नसल्याने हॅकर्सच्या हल्ल्यांना त्या बळी पडू शकतात.

अशा हल्ल्यांमध्ये केवळ पैसेच नव्हे, तर गोपनीय माहितीदेखील हॅकर्सचे लक्ष्य असते. कार्ड क्‍लोनिंग, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी क्रमांक चोरण्याचे प्रकार सुरू आहेत. ‘रॅन्समवेअर’द्वारे बॅंकेची किंवा कंपन्यांची सुरक्षा यंत्रणा हॅक करून खंडणी वसूल करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.

सायबर हल्ला म्हणजे काय?
मालवेअर हल्ल्यात मलेशिअस व्हायरस सॉफ्टवेअर तयार करून हॅकर्स बॅंकांची यंत्रणा नियंत्रणाखाली आणतात. ही यंत्रणा ताब्यात आली, की पैसे किंवा गोपनीय माहिती चोरणे शक्‍य होते. ‘रॅन्समवेअर’मध्येही हेच घडले. एकदा बॅंकेची संपूर्ण यंत्रणा हॅक केली, की ती पूर्ववत करण्यासाठी हॅकर्स संबंधितांकडून खंडणी वसूल करतात.

‘सीईआरटी-इन’चे आहे लक्ष..!
सायबर हल्ले थांबवण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन)काही वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या वर्षी भारतात तब्बल ४० रॅन्समवेअर हल्ल्यांची नोंद झाली होती.

बॅंकांच्या सायबर सुरक्षा यंत्रणेच्या नियंत्रणाची जबाबदारी मोजक्‍या व्यक्तींवर असते. लहान बॅंका बाह्यसुरक्षेवर लक्ष देतात; पण सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. अद्ययावत तंत्रज्ञान वापरूनही त्यावर पुरेसे मनुष्यबळ नसल्याने बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो.
- ॲड. जयश्री नांगरे, सायबर कायदेविषयक तज्ज्ञ 

बॅंकांमधील सायबर सिक्‍युरिटी ऑपरेशन सेंटर सायबर हल्ल्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. बॅंकांची सायबर सुरक्षा भेदण्यासाठी दररोज हजारो सायबर हल्ले होतात, काही सायबर यंत्रणा दक्षतेचा इशारा देते. मॉनिटरिंग करणाऱ्या टीमने त्यादृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजेत.
- निरंजन रेड्डी, सायबर तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com