ऊसशेती, कचऱ्यामुळे बिबट्या शहराला सरावला

ऊसशेती, कचऱ्यामुळे बिबट्या शहराला सरावला

पुणे - शहराभोवती वाढलेले उसाचे क्षेत्र तसेच रस्त्यावर साठलेल्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे बिबट्याचा वावर शहराभोवती आणि परिसरात वाढू लागल्याचे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे. बिबटे आता शहरी वातावरणाला सरावले असून, भक्ष्याच्या शोधार्थ त्यांनी सीमा ओलांडून शहरात प्रवेश केल्याचाही अंदाज त्यांनी वर्तविला. 

केशवनगरमध्ये सोमवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेसह तिघे जखमी झाले. या पार्श्‍वभूमीवर बिबट्याच्या वावराबाबत माजी वन अधिकारी प्रभाकर कुकडोलकर म्हणाले, ‘‘बिबट्या पूर्वी पश्‍चिम घाटातच दिसत होता. कालांतराने उसाच्या शेतीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे त्याचेही फिरण्याचे क्षेत्र वाढले. दौंड, शिरूर, इंदापूर, सासवड आदी ठिकाणीही त्याचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याच्या दोन पिढ्या आता उसाच्या शेतीला सरावल्या आहेत. त्यामुळे उस त्याला त्याचा अधिवास वाटू लागला आहे. त्यामुळे पुण्याच्या चारही दिशांना तो नियमितपणे दिसू लागला तर आश्‍चर्य वाटायला नको.’’

 वन्यजीव अभ्यासक किरण पुरंदरे म्हणाले, ‘‘अनेक ठिकाणी रस्त्यांवर साठणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे कुत्रे आणि डुकरांचीही संख्या वाढत आहे. हे दोन्ही प्राणी बिबट्याला खाद्य म्हणून हवे असतात. त्यांच्या शोधार्थ तो मोठे अंतरही पार करतो. एका रात्रीत त्याने सुमारे १५-२० किलोमीटरचे अंतरही पार केल्याच्या नोंदी आहेत.’’ इतर प्राण्यांच्या तुलनेत बिबट्या हा शहरी वातावरणाला आता सरावला आहे. हे लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने नागरिकांमध्ये याबाबत जागरूकता करायला हवी, असेही मत पुरंदरे यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com